For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजचा सलग तिसऱ्यांदा स्वप्नभंग!

06:56 AM Aug 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
विंडीजचा सलग तिसऱ्यांदा स्वप्नभंग
Advertisement

2027 वनडे वर्ल्डकपची थेट पात्रता हुकली :  पुन्हा क्वालिफायरची टांगती तलवार

Advertisement

वृत्तसंस्था

लंडन

Advertisement

अफगाणिस्तान-आयर्लंड वनडे मालिकेच्या निकालाचा वेस्ट इंडिजला दणका बसला आहे. आयर्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानने पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवत 2-0 अशी आघाडी घेतली. या निकालासह अफगाणिस्तानने वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवली आहे. दुसरीकडे, दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला सलग तिसऱ्यांदा थेट पात्रता मिळवण्यात अपयश आले असून आता वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.

2027 चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट स्थान मिळाले आहे. उर्वरित आठ जागा आयसीसी वनडे रँकिंगच्या आधारे निश्चित होणार आहेत. अशातच आयर्लंडविरुद्ध दोन वनडे सामने जिंकत अफगाण संघाने वनडे वर्ल्डकपसाठी पात्रता मिळवली आहे. 2019 मध्ये वनडे क्रमवारीतील टॉप 8 मध्ये स्थान न मिळाल्यामुळे वेस्ट इंडिजला थेट पात्रता मिळाली नव्हती. मात्र, झिम्बाब्वेमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून त्यांनी वर्ल्ड कपमध्ये स्थान निश्चित केले होते. यानंतर 2023 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला थेट पात्रता मिळवता आली नाही, तसेच क्वालिफायरच्या माध्यमातूनही स्पर्धेत स्थान मिळवता आले नाही. आता 2027 च्या वर्ल्ड कपसाठीही विंडीज संघाला थेट पात्रतेऐवजी पुन्हा पात्रता फेरी खेळून स्पर्धेत स्थान मिळवावे लागेल. अर्थात, आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या अफगाण संघाने दोन्ही वनडे सामने जिंकत विंडीज संघाला हा दणका दिला आहे.

क्वालिफायरमध्ये खेळावे लागणार

वेस्ट इंडिजचा संघ सध्या वनडे क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या नियमानुसार, यजमान संघ वगळता वनडे क्रमवारीतील आघाडीच्या 8 मध्ये असलेल्या पूर्ण सदस्य देशांना वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळते. सध्याच्या घडीला यजमान आफ्रिकन आणि सहयजमान झिम्बाब्वे संघ थेट पात्र ठरले आहेत. या विजयामुळे अफगाणिस्तानची स्थिती अधिक मजबूत झाली आणि वेस्ट इंडिजच्या थेट पात्रतेची संधी जवळजवळ संपुष्टात आली आहे.

विंडीजला थेट पात्रता मिळवण्यासाठी आयर्लंडने अफगाणविरुद्ध मालिका 5-0 किंवा 4-1 अशा फरकाने जिंकणे आणि त्यानंतर विंडीजने भारताविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकणे आवश्यक होते. मात्र, आयर्लंड-अफगाणिस्तान मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांच्या निकालानेच हे समीकरण बदलले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेत वेस्ट इंडिजची कामगिरी कितीही चांगली झाली, तरी त्यांना 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्रता मिळवता येणार नाही. त्यामुळे 2027 मध्ये वेस्ट इंडिज थेट खेळणार की पुन्हा एकदा क्वालिफायरच्या मार्गाने जावे लागणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.