कसोटी मालिकेत विंडीजची विजयी सलामी
बांगलादेशचा 201 धावांनी पराभव, जस्टीन ग्रिव्स ‘सामनावीर’, तस्किन अहमदचे 6 बळी वाया
वृत्तसंस्था / नॉर्थ साऊंड (अॅन्टीग्वा)
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान विंडीजने विजयी सलामी दिली. येथे झालेल्या पहिल्या कसोटीत मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी विंडीजने बांगलादेशचा 201 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात नाबाद शतक (115) आणि गोलंदाजीत 34 धावांत 2 बळी मिळविणाऱ्या विंडीजच्या जस्टीन ग्रिव्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
विंडीजने विजयासाठी 334 धावांचे आव्हान दिल्यानंतर बांगलादेशने चौथ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 7 बाद 109 धावा जमविल्या होत्या. मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव 38 षटकात 132 धावांत आटोपला. बांगलादेशचे शेवटचे तीन गडी केवळ 23 धावांची भर घालत तंबुत परतले. अल्झारी जोसेफने हसन मेहमुदला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. त्यानंतर त्याने जाकरअलीला पायचित केले. जाकरअलीने 58 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या. एस. इस्लाम दुखापतीमुळे निवृत्त झाल्याने बांगलादेशचा दुसरा डाव 132 धावांवर आटोपला. विंडीजतर्फे रॉच आणि सिलेस यांनी प्रत्येकी 3 तर अल्झारी जोसेफने 2 व शमार जोसेफने 1 गडी बाद केला.
या कसोटी सामन्यात विंडीजने आपला पहिला डाव 9 बाद 450 धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 9 बाद 269 धावांवर घोषित केला. विंडीजने पहिल्या डावात बांगलादेशवर 181 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर विंडीजचा दुसरा डाव 46.1 षटकात 152 धावांत आटोपला. बांगलादेशच्या तस्किन अहम्मदने 63 धावांत 6 गडी बाद केले. बांगलादेशला शेवटच्या डावात फलंदाजी करुन विजय मिळविण्यासाठी खूपच अवघड गेले आहे. विंडीजच्या भेदक माऱ्यासमोर त्यांनी दुसऱ्या डावात 31 षटकात 7 बाद 109 धावा जमविल्या होत्या.
या सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवशी गोलंदाजांची कामगिरी अधिक प्रभावी ठरली. खेळाच्या तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशचा पहिला डाव 9 बाद 269 धावांवर घोषित केला. त्यानंतर चौथ्या दिवशी एकूण 17 गडी बाद झाले. गोलंदाजांनी हा दिवस गाजविला. विंडीजच्या दुसऱ्या डावात कर्णधार ब्रेथवेटने 35 चेंडूत 1 चौकारासह 23, हॉजने 3 चौकारांसह 15, अॅलिक अथानेजने 63 चेंडूत 7 चौकारांसह 42, डिसिल्वाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22, अल्झारी जोसेफने 25 चेंडूत 2 चौकारांसह 17 आणि रॉचने 1 षटकारासह 12 धावा जमविल्या. बांगलादेशचा तस्किन अहम्मद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 64 धावांत 6 गडी बाद केले. मेहदी हसन मिराजने 2 तर एस. इस्लाम आणि टी. इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विंडीजच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा दुसरा डाव कोलमडला. कर्णधार मेहदी हसन मिराजने एकाकी लढत देत 46 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 45 तर दासने 2 चौकारांसह 22, मोमीनुल हक्कने 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. जाकर अली 2 चौकारांसह 15 तर टी. इस्लाम 4 धावांवर खेळत आहेत. विंडीजतर्फे रॉच आणि सिलेस यांनी प्रत्येकी 3 तर शमार जोसेफने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव 9 बाद 450 डाव घोषित, बांगलादेश प. डाव 98 षटकात 9 बाद 269 डाव घोषित, विंडीज दु. डाव 46.1 षटकात सर्वबाद 152 (अॅथनेझ 42, डिसिल्वा 22, ए. जोसेफ 17, रॉच 12, हॉज 15, तस्किन अहमद 6-64, मेहदी हसन मिराज 2-31, एस. इस्लाम 1-9, टी. इस्लाम 1-25), बांगलादेश दु. डाव 38 षटकात सर्व बाद 132 (मेहदी हसन मिराज 45, दास 22, जाकर अली 31, मोमीनुल हक्क 11, सिलेस 3-45, रॉच 3-20, अल्झारी जोसेफ 2-32, शमार जोसेफ 1-22)