For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विंडीजची कसोटी मालिकेत विजयी सलामी

06:36 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
विंडीजची कसोटी मालिकेत विजयी सलामी
Advertisement

जोमेल वेरीकेन ‘सामनावीर’ : लंकेचा आठ गड्यांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था, ढाका

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजने यजमान बांगलादेशचा पहिल्या सामन्यात 8 गड्यांनी दणदणीत पराभव करुन विजयी सलामी दिली. या सामन्यात 9 गडी बाद करणारा विंडीजचा वेरीकेन याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 272 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 245 धावा केल्याने बांगलादेशने 27 धावांची किरकोळ आघाडी विंडीजवर मिळविली होती. त्यानंतर विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा दुसरा डाव 48.4 षटकात 142 धावांत आटोपला. बांगलादेशने 6 बाद 79 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 4 गडी 63 धावांची भर घालत तंबूत परतले. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात नईम हसनने एकाकी लढत देत 91 चेंडूत 4 चौकारांसह 52 धावा जमविल्या. जाकर अलीने 2 चौकारांसह 22, शांतोने 1 चौकारासह 10 तर शदमान इस्लामने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. विंडीजतर्फे वेरीकेनने 63 धावांत 4 तर रॉयस्टन चेसने 36 धावांत 5 गडी बाद केले.

विंडीजला निर्णायक विजयासाठी 170 धावांचे आव्हान मिळाले. विंडीजने 35.1 षटकात 2 बाद 170 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला. सलामीच्या ब्रेंडॉन किंगने 115 चेंडूत 14 चौकारांसह नाबाद 81 धावा झळकविताना कॅम्पबेल समवेत सलामीच्या गड्यासाठी 20.5 षटकात 112 धावांची शतकी भागिदारी केली. कॅम्पबेलने 55 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 49 धावा जमविल्या. चंद्रपॉल एका धावेवर बाद झाला. किंग आणि हॉज यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 50 धावांची भागिदारी करुन विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हॉजने 27 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 31 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम आणि हसन मेहमूद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उभय संघातील ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे. आता या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी 5 नोव्हेंबरपासून सिलेत येथे खेळवली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक - बांगलादेश प. डाव 272, विंडीज प. डाव 245, बांगलादेश दु. डाव 48.4 षटकात सर्वबाद 142 (नईम हसन 52, जाकर अली 22, शदमान इस्लाम 15, शांतो 10, वेरीकेन 4-63, चेस 5-63), विंडीज दु. डाव 35.1 षटकात 2 बाद 170 (किंग नाबाद 81, हॉज नाबाद 31, कॅम्पबेल 49, चंद्रपॉल 1, एस. इस्लाम व हसन मेहमूद प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.