विंडीज-इंग्लंड कसोटी आजपासून
वृत्तसंस्था /एजबेस्टन
यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी विंडीज संघामध्ये दुखापतग्रस्त लुईसच्या जागी अकिम जॉर्डनचा समावेश करण्यात आला आहे. यजमान इंग्लंडने या मालिकेत सलग दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. आता इंग्लंडचा संघ या मालिकेत विंडीजचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर विंडीजचा संघ हा शेवटचा सामना जिंकून इंग्लंडला एकतर्फी विजयापासून रोखण्याचा प्रयत्न करेल. विंडीजचा अकिम जॉर्डन याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. या तिसऱ्या कसोटीत तो आपले कसोटी पदापर्ण करेल. जॉर्डनने यापूर्वी दोन वनडे सामन्यात विंडीजचे प्रतिनिधीत्व केले आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत लुईसला स्नायु दुखापत झाली होती. नवोदित जॉर्डनने आतापर्यंत 19 प्रथम श्रेणी सामन्यात 67 बळी मिळविले आहेत. या शेवटच्या कसोटीसाठी विंडीज संघामध्ये हा एकमेव बदल राहिल. इंग्लंडने पहिल्या कसोटीत विंडीजचा डावाने तर दुसऱ्या कसोटीत त्यांनी विंडीजचा 241 धावांनी पराभव केला होता. इंग्लंड संघाने यापूर्वीच रिचर्डस-बोथम करंडकावर आपले नाव कोरले आहे.
विंडीज संघ: क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), अथांजे, जोशुआ डिसील्वा, होल्डर, हॉज, इमलॅक, जॉर्डन, अलझारी जोसेफ, शमार जोसेफ, लुईस, मॅकेस्की, मॅकेंझी, मोती, रॉच, सिलेस आणि सिंक्लेअर.