For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीजने युगांडाला 39 धावांवर गुंडाळले

06:22 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीजने युगांडाला 39 धावांवर गुंडाळले
Advertisement

टी 20 वर्ल्डकपमधील निचांकी धावसंख्या : विंडीजचा 134 धावांनी विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ गयाना, वेस्ट इंडिज

यजमान वेस्ट इंडिजने नवख्या युगांडाला 39 धावांत गुंडाळत तब्बल 134 धावांनी दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा केल्या. अकिल हुसेनच्या फिरकीसमोर युगांडाचा संघ 39 धावांत गारद झाला. विशेष म्हणजे, टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत निचांकी धावसंख्येच्या विक्रमाशी युगांडाने बरोबरी केली. तसेच विंडीजने टी 20 वर्ल्डकपमधील धावांच्या फरकाने मिळवलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा विजय आहे. दरम्यान, विंडीजचा हा वर्ल्डकपमधील दुसरा विजय आहे.

Advertisement

प्रोव्हिडन्स येथे झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. जॉन्सन चार्ल्स आणि ब्रँडन किंग यांनी 41 धावांची सलामी दिली. चार्ल्सने फटकेबाजी सुरु ठेवत 44 धावांची खेळी केली. किंग 11 धावा काढून बाद झाला. निकोलस पूरन (22), रोव्हमन पॉवेल (23) आणि शेरफन रुदरफोर्ड (22) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. आंद्रे रसेलने 17 चेंडूत 6 चौकारांसह 30 धावांची खेळी केली. या जोरावर विंडीजने 20 षटकांत 5 बाद 173 धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना युगांडाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जुमा मियागीचा अपवाद वगळता युगांडाच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. डावखुरा फिरकीपटू अकिल हुसेनने 4 षटकात 11 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स पटकावल्या. अकिलच्या भेदक माऱ्यासमोर युगांडाचा संपूर्ण संघ 12 षटकांत 39 धावांवर ऑलआऊट झाला. अल्झारी जोसेफने 2 तर रोमारिओ शेफर्ड, आंद्रे रसेल, गुदकेश मोटी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत हुसैनला चांगली साथ दिली. मियागीने सर्वाधिक 13 धावा केल्या.

महत्वाचा बॉक्स

टी 20 वर्ल्डकपमधील निचांकी धावसंख्या

39 - युगांडा वि. वेस्ट इंडिज, प्रोव्हिडन्स, 2024

39 - नेदरलँड वि. श्रीलंका, चितगाव, 2014

44 - नेदरलँड वि. श्रीलंका, शारजाह, 2021

55 - वेस्ट इंडिज वि. इंग्लंड, दुबई, 2021

टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठे विजय (धावांच्या फरकाने)

172 - श्रीलंका वि. केनिया, जोहान्सबर्ग, 2007

134 - वेस्ट इंडिज वि. युगांडा, प्रोव्हिडन्स, 2024

130 - अफगाणिस्तान वि. स्कॉटलंड, शारजाह, 2021

130 - दक्षिण आफ्रिका वि. स्कॉटलंड, ओव्हल, 2009

Advertisement
Tags :

.