For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वच्छता करताना मिळाले ‘घबाड’

06:14 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वच्छता करताना मिळाले ‘घबाड’
Advertisement

ही स्वारस्यपूर्ण घटना ब्रिटनमधील आहे. या देशातील लुईसा आणि डेन हे जोडपे एका 100 वर्षांपूर्वी बांधलेल्या घरात रहात आहे. 2020 मध्ये या जोडप्याला या घरात एक तळघर आहे, याचा शोध लागला. त्यामुळे त्यांनी या तळघराची स्वच्छता करण्याचे ठरविले त्याप्रमाणे स्वच्छता करताना त्यांना एक चारी बाजूंनी विटांचे बांधकाम असलेली बंद खोली आढळली. या जोडप्याने ती बंद खोली तोडली. या खोलीत बरीच घाण साचली होती. ती काढून टाकून ती खोली उपयोगात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याप्रमाणे स्वच्छतेला प्रारंभ केला. तेथे त्यांना कोळशाच्या ढिगाऱ्यासह अनेक वस्तू हाती लागल्या. त्यांच्यातील निरुपयोगी वस्तू त्यांनी टाकून दिल्या. पण एका वस्तूने त्यांना समाधान दिले.

Advertisement

या खोलीत त्यांना गंज लागलेला एक बंद डबा मिळाला. या डब्याला अमोनियाचा उग्र वास येत हाता. त्यामुळे तो डबा उघडण्याचे त्यांना धाडस झाले नाही. त्यात कोणतातरी विषारी पदार्थ असेल, अशी शंका त्यांना आली. तथापि, काही काळानंतर त्यांनी तो उघडून पाहिल्यावर त्यांच्या आश्चर्याला आणि आनंदालाही पारावार उरला नाही. या मोठ्या डब्यात 1970 पूर्वीच्या काळातील नोटांचे गठ्ठे त्यांना मिळाले. हे गठ्ठे पाच पौडांच्या नोटांचे होते. एकंदर रक्कम साधारणत: 1 हजार पौंड इतकी होती. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम साधारणत: 1 लाख 15 हजार रुपये इतकी होती. याचवेळी ब्रिटनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. या काळात लुईसा यांची नोकरी गेली. त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागले होते. या काळात ध्यानीमनी नसताना सापडलेली रक्कम त्यांच्या फार उपयोगी पडली. त्यांनी त्यातील काही पैसे आता त्यांनी आपल्या मुलांच्या नावे बँकेत ठेव म्हणून ठेवले आहेत. त्यांच्या या घराचे बांधकाम इसवी सन 1900 मध्ये झाले होते. नंतर 1965 च्या आसपास ते या कुटुंबाकडे आले. पण अनेक वर्षे त्यांना या घरात तळघर आहे, याचा पत्ताही नव्हता. पण याच तळघराने त्यांना मोठे आर्थिक साहाय्य केले आणि कोरोनाच्या आव्हानात्मक काळात त्यांना आधार दिला. या तळघराने त्यांचे भाग्य उजळवले अशी या निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाची भावना आहे. सध्या ही घटना सोशल मिडियावर प्रसिद्धी पावली आहे.

Advertisement
Advertisement

.