Amit Thackeray | निवडणुका जिंका, पण खून करू नका : अमित ठाकरे
ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे कुटुंबाला दिले सांत्वन
सोलापूर : आज राज्यात काय होत आहे. महापालिका निवडणुका कुठल्या पातळीवर जात आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात येऊन पहावे. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, तर खुशाल जिंका, आम्ही सगळे माघार घेतो, पण राजकारणासाठी कुणाचा खून करू नका, असे आवाहन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सोलापुरात केले.अमित ठाकरे यांची बाळासाहेब सरवदे यांच्या घरी सांत्वनपर भेट
सोलापुरातील मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खुनाच्या घटनेनंतर रविवारी अमित ठाकरे यांनी सोलापुरातील जोशी गल्ली येथील बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
सोलापुरात घडलेल्या घटनेने मी भाबुक झालो आहे. अशा प्रसंगी राजकारण करण्याचा माझा कोणताच प्रयत्न नाही. मात्र महापालिका निवडणुकीतही अशा गंभीर घटना घडणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे राज्याची बदनामी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मी सोलापुरातील घटनेची माहिती देणार आहे, त्यांना मी याबाबत प्रश्न उपस्थित करेन, त्यांनी मला केवळ दहा मिनिटांचा वेळ द्यावा, अशी विनंतीही ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
बाळासाहेब सरबदे यांच्या खुनामुळे आज त्यांच्या कुटुंबाबर मोठा आघात झाला आहे. बाळासाहेब यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, मात्र, अशा घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. याप्रकरणी सविस्तर चौकशी व्हावी, अशीही मागणी यावेळी ठाकरे यांनी केली..
सोलापुरात घडलेल्या घटनेने मी अत्यंत भावुक आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी याबाबत सोलापूरच्या पोलिसांना काहीच बोलणार नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मी माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवीन असेही ठाकरे यांनी सांगितले.