For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा

10:53 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा
Advertisement

माजी गृहमंत्री पी.जी.आर. सिंधिया यांचे आवाहन

Advertisement

खानापूर : कारवार मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहेच, तसेच संपूर्ण मतदारक्षेत्रात वैविध्यतेने नटलेला असून एकीकडे समुद्रकिनारा आणि घनदाट जंगल आणि यात राहणारी कष्टकरी जनता गुण्यागोविंदाने नांदत आहे. मात्र विकासाबाबत कारवार मतदारसंघाची पूर्णपणे पीछेहाट झाली आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अंजली निंबाळकरसारख्या उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे. काँग्रेसने धाडस करून खानापूरला उमेदवारी दिली आहे. याचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी तालुक्यातील समस्त मतदारांनी अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी राहून तालुक्यातून मताधिक्य द्यावे, असे आवाहन माजी गृहमंत्री आणि मराठा समाजाचे नेते पी.जी.आर. सिंधिया यांनी खानापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर पी.जी.आर. सिंधिया आले होते. ते म्हणाले, निंबाळकर यांच्यात उत्तम नेतृत्व गुण, संघटन कौशल्य आहे.

सामान्य कार्यकर्त्या आणि अभ्यासू वृत्तीमुळे आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी वेळोवेळी विधानसभेत मतदारसंघाच्या विकासासाठी आवाज उठविला आहे. कारवार मतदारसंघाचा विकास व खानापूर तालुक्याच्या विकासासाठीही अंजली निंबाळकर यांना लोकसभेत पाठविणे गरजेचे आहे. भाजप समाजात धर्माच्या नावाखाली ध्रुवीकरण करत असून राम हा सगळ्यांच्या श्रद्धेचाच विषय आहे. भाजपने राम आणि राम मंदिराचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला आहे. रामाची तत्वे ही सर्व समाजाभिमुख होती. रामराज्य ही संकल्पना सर्वसामान्यांच्या हिताचीच होती. मात्र, भाजप भांडवलदारांचे हित जपत आहे. राज्यात दुष्काळ असताना दुष्काळ निवारणासाठी निधी वाटपात केंद्राने दुट्टप्पी भूमिका घेतली. सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर तीन हजार पाचशे कोटीचा निधी देण्यात आला आहे. यावरून भाजपची राजकीय द्वेषवृत्ती समजून येते. काँग्रेसने राज्यात पाच गॅरंटी योजना सुरू केल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात बदल दिसून येत आहे. मात्र, भाजप या योजनांबाबत अपप्रचार करत आहे. या योजना लोकसभेच्या निवडणुकीनंतरही कायम राहणार आहेत. यात शंका नाही, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.