अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा
कोटेवाड येथील काँग्रेसच्या सभेत आमदार सतीश सैल यांचे आवाहन
कारवार : डॉक्टर होऊन समाजसेवेला वाहून घेतलेल्या कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर आता जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. निंबाळकर यांना विजयी करण्याची जबाबदारी मतदारांनी स्वीकारावी, असे आवाहन कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी केले. सोमवारी अंकोला तालुक्यातील कोटेवाड येथे आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने गॅरंटी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून महिला वर्गाच्या पंखांना बळ प्राप्त करून दिले आहे. इतिहासाची पाने परतून पाहिली तर गरिबांसाठी अनेक योजना काँग्रेस पक्षाने राबविल्याचे दिसून येते. भाजपप्रमाणे काँग्रेस खोट्या आश्वासनांची खैरात करीत नाही. खोटारडेपणाचा बादशहा बनून राहीलेल्या भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जसे काँग्रेसचे पारडे वरचढ राहीले. त्याप्रमाणे येत्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच बाजी मारणार याबद्दल वाद नाही. असा विश्वास पुढे सैल यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले, सरकारच्या गॅरंटी योजनांचा प्रत्येक लाभार्थी आपले मत काँग्रेसच्या पारड्यात टाकणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार निंबाळकर यांचा अधिक प्रचार करायची गरज नाही. गॅरंटी योजनामुळे जनता सुखी जीवन जगत आहे. गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकारने युवकांना बेरोजगार करण्याच्या पलीकडे काहीही केले नाही. यावेळी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य, उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष साई गावकर, सुजाता गावकर, रविंद्रनाथ नाईक, सतीश नाईक, पांडुरंग गौडा आदी उपस्थित होते.