Wilson Road Kolhapur: अरे हा तर विल्सन रोड!, क्रांतिकारकांचा विल्सन पुतळ्यासमोरील थरारक इतिहास..
जो "चहा पेक्षा किटली गरम“ अशा अन्य अधिकाऱ्यांनी पसरवलेला होता
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : ऐंशी, पंचाऐंशी वर्षापूर्वीच्या काळातला हा विल्सन रोड आणि रोडच्या एका टोकाला विल्सन चौक. या चौकात दगडी चबुतऱ्यावर गव्हर्नर विल्सनचा संगमरवरी दगडात घडवलेला पुतळा होता. या पुतळ्याकडे कोणी ताठ मानेने बघायचं नाही. पुतळ्यापुढे मान थोडी झुकवायचीच, असा एक अलिखीत नियमही होता. जो ‘चहा पेक्षा किटली गरम“ अशा अन्य अधिकाऱ्यांनी पसरवलेला होता. पण, कोल्हापूरकर त्याला कधी दाद देत नव्हते.
उलट मुद्दाम मान खाली घेऊन तोंडातल्या तोंडात या विल्सनला कोल्हापुरी भाषेत अगदी शेलक्या शिव्या देत होते. विल्सनच्या नावाचा हा रोड आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तेथून बिंदू चौक, शाहू टॉकीज, आईसाहेब महाराज पुतळा ते लक्ष्मीपुरीत विल्सन पुलापर्यंत होता. कोल्हापुरातील क्रांतिकारकांनी या रोडवरच्या विल्सनच्या पुतळ्यासमोर थरारक असा एक इतिहास घडवला.
भागीरथीबाई तांबट व जयाबाई हविरे यांनी यावेळी पुतळ्यावर डांबर फेकून तो विद्रुप केला आणि त्यानंतर काही महिन्यांनी स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारकांनी हा पुतळाच फोडला. त्याही पुढे जाऊन कोल्हापुरातील शिवप्रेमींनी या विल्सनच्या पुतळ्याच्या जागीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. स्वातंत्र्यापूर्वीच कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा हा इतिहास घडला आणि कोल्हापुरातील विल्सन रोड कागदावरून पुसला गेला.
एका जुन्या ब्लॅक-व्हाईट छायाचित्राच्या निमित्ताने हा विल्सन रोड पुन्हा कोल्हापूरकरांच्या समोर काल आला. त्या वेळचा तो विल्सन रोड आणि आताचा शिवाजी रोड यात जमीन-आसमानचा फरक. त्यामुळे कोल्हापूरकरांनाच हा रस्ता नेमका कोणता हे कळेना. एकमेकाला विचारणा सुरू झाली. व्हॉट्सअप, फेसबुक वरुन हा रस्ता कोणता या प्रश्नासह हा रस्ता अनेकांच्या मोबाईलवर जाऊन पोहोचला.
वेगवेगळे तर्क अंदाज सुरू झाले. पण, कोल्हापुरातल्या बहुतेकांना हा रस्ता ओळखताच येईना. बुधवारी सकाळी या रस्त्यावरचे जुने रहिवासी विश्वनाथ कोरी यांना या रस्त्याचे मूळ रुप लक्षात आले व त्यांनी हा रोड म्हणजे त्या वेळेचा विल्सन रोड व या रस्त्याच्या दोन्ही बाजूस त्यावेळी राहायला असलेले व आता तेथे कोण राहतात याची माहिती दिली.
यामुळे छायाचित्राचे नेमके महत्त्व कळू शकले. या रस्त्यावर त्यावेळची कोल्हापूर बँक होती. करवीर संस्थांनचे छायाचित्रकार मकानदार यांचा दरबार स्टुडिओ होता. राजाराम महाराजांचे जॉकी जाधव यांचा राजाराम व्हिला आहे. दोन नंबर बीडीचा कारखाना होता. फक्त चेकची छपाई करणारा ज्ञानेश्वर हा जुना प्रेस होता. प्रेसला लागून दरकशेट्टी यांची कमल टॉकीज होती. त्या टॉ कीजचे मूळ नाव अमेरिकन इंडिया होते.
हेमंत स्पोटर्स हे जुने दुकान आहे. गरगटे, नाळे सायकल, मोहन उचले, विश्वनाथ कोरी व आराम कॉर्नर हा एका वेगळ्या नावाचाच कॉर्नर या रस्त्यावर आहे. घोड्याच्या रेसवरच्या जुगाराची बुकिंग या आराम कॉर्नरला होत असे. चपाती, मटण व बिर्याणीचा घमघमाट पसरवणारे श्रीकृष्ण उर्फ मावशीचे हॉटेल होते. विठ्ठलाचे मंदिर गंजी तालीम व हत्तींना बांधला जाणारा हत्तीमहाल होता.
आता तिथे शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे. या रस्त्यावर जाधवांची मोठी इमारत होती. महाराष्ट्र कर्नाटक वादातून कोल्हापुरात झालेल्या दंगलीत या इमारतीला आग लावली त्यात भारत वॉच कंपनी हे दुकान जळून खाक झाले. पण, यात धाडस केलेल्या एका तरुणाचा या आगीत अडकून मृत्यू झाला. शिवाजी रोड हा रस्ता कोल्हापुरात प्रसिद्ध म्हणून नव्हे तर कोल्हापूरच्या अनेक उलाढालीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
शिवाजी चौकातून विल्सन पुलाकडे जाणारा हा रस्ता म्हणजे व्यापारी उलाढालीचेही मोठे केंद्र आहे. बोहरा समाजाची मशीद याच रस्त्यावर आहे. हा शिवाजी रोड कोल्हापूरच्या क्रांतिकारी शौर्याचा साक्षीदारही आहे. एका जुन्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्राच्या निमित्ताने हा सारा इतिहास कोल्हापूरकरांच्या समोर पुन्हा आला आहे.