उपचार करणार, की चपला सांभाळणार ?
अनेक सार्वजनिक स्थानी कार्यक्रम किंवा अन्य कारणांसाठी गेल्यास, आणि तेथे चपला बाहेर काढून ठेवायचा नियम असल्यास आपली फारच अडचण होते, हा अनुभव प्रत्येकाला असतो. कारण आपण आत कार्यक्रम पाहण्यात गुंग असताना बाहेर आपल्या चपला किंवा पादत्राणे ‘गुल’ होण्याचा संभव असतो. विशेषत: नव्या कोऱ्या पादत्राणांवर तर अशा भुरट्या चोरांची सराईत दृष्टी पडतेच पडते. त्यामुळे या चपलांच्या मालकाची आर्थिक हाणी तर होतेच. पण चप्पल न घालता घरापर्यंत जाण्याची वेळ येते. जवळपास प्रत्येकाला हा अनुभव एकदा तरी आलेलाच असतो.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयात हा पादत्राणे चोरीला जाण्याचे प्रकार इतक्या प्रमाणात घडत आहेत, की तेथे जाणारे रुग्ण अक्षरश: वैतागले आहेत. रुग्णालयात तपासणी करुन घ्यायची, की. चपला सांभाळायच्या, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या रुग्णालयात येणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाच्या आणि त्याच्यासह आलेल्या त्याच्या नातेवाईकाच्या चपला चोरीला जातात. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चपला कशा सुरक्षित ठेवायच्या असा प्रश्न पडलेला असतो. रुग्णालय असल्याने थेट डॉक्टरच्या तपासणी कक्षापर्यंत चपला घालून जाता येत नाही. त्या बाहेरच काढून ठेवाव्या लागतात. बाहेर काढून ठेवल्या, की हमखास त्या चोरीला जातात. याच रुग्णालयात हे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात का घडतात, हे न उलगडलेले कोडे आहे. केवळ चपलाच नव्हे, तर रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अन्य वस्तूही चोरीला जात असतात. चोरांचा इतका सुळसुळाट या रुग्णालयात कसा, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
विशेषत: या रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाबाहेर हा प्रकार सातत्याने घडतो. अनेकदा प्रशासनाकडे यासंबंधी तक्रार नोंदविली गेली आहे. तथापि, प्रशासनाने काहीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे रुग्ण संतप्त झाले आहेत. हे चपलाचोरीचे रॅकेट प्रशासनाच्या वरदहस्तानेच चालते, अशी सर्वसामान्यांची समजूत आहे. गेल्या सात आठ महिन्यात चपलाचे अक्षरश: हजारो जोड पळविण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशात या रुग्णालयाची चर्चा तेथील उपचारांमुळे नव्हे, तर चपला चोरीला जाण्याच्या घटनांमुळे अधिक होत आहे, असे दिसून येते.