‘केपीएस मॅग्नेट’विरेधात तीव्र लढा उभारणार
पालक बैठकीत निर्णय; जिल्हा समिती स्थापन
बेळगाव : सरकारी शाळांना सुविधा देऊन त्यांना बळकटी मिळवून देण्याऐवजी केपीएस मॅग्नेटच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप पालकवर्गातून होत आहे. याला साहित्यिकांसह विविध संघटनानीही समर्थन दर्शविले आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया डेमॉक्रॉटिक स्टुडन्ट्स ऑर्गनायजेशनच्या नेतृत्वात रविवार दि. 1 रोजी डॉ. आंबेडकर उद्यानात झालेल्या पालकांच्या बैठकीत केपीएस मॅग्नेट योजनेबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. साहित्यिक यल्लप्पा हिम्मडी म्हणाले, कर्नाटक सरकारने केपीएस मॅग्नेट योजनेंतर्गत सरकारी शाळा बंद करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा. अन्यथा चळवळ तीव्र करण्यात येईल. सरकारी शाळांमुळेच शिक्षण क्षेत्राचा उध्दार शक्य आहे.
प्रा. डॉ. एच. बी. कोलकार म्हणाले, खासगी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी शाळा बंद करण्याचा कुटिल प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. भ़ांडवलदारांशी राजकीय नेत्यानी संधान जुळविले आहे. खासगीकरणावर भर देऊन गरिबांचे जीवन कठीण बनविण्याचे सुरू आहे. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य बनविण्यासाठी सरकारी शाळांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न गरजेचे आहे. त्यानंतर, एआयडीएसओचे विनयचंद्र यांनी विचार मांडले, कर्नाटकात केपीएस मॅग्नेटच्या नावाखाली 40 हजार शाळा बंद करण्याचा घाट सरकारने रचला आहे. मात्र, याविरेधात राज्यभरातून जनआंदोलने सुरू आहेत. गावोगावी समित्या स्थापन करून सरकारी शाळांच्या जनतानासाठी लढा तीव्र करण्यात यावा, असे आवाहन केले. दरम्यान, केपीएस मॅग्नेट योजनेला विरोध दर्शविण्यासाठी चाललेल्या लढ्याला जिह्यातून बळकटी मिळवून देण्यासाठी जिल्हा समितीची स्थापना करण्यात आली. जिह्यातील शेतकरी, विद्यार्थी, युवावर्ग, महिला आदी संघटनांनी एकत्र येऊन लढा पुढे चालूच ठेवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.