For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे टर्मिनस पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार

03:04 PM Jan 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
रेल्वे टर्मिनस पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार
Advertisement

जि. प , पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी टर्मिनसचा मुद्दा ऐरणीवर

Advertisement

न्हावेली /वार्ताहर
जिल्हा परिषद व पंचायत समिती आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच सिंधुदुर्गातील जागरुक मतदारांनी विकासाचा एक अत्यंत महत्वाचा आणि गेल्या दहा वर्षापासून रखडलेला मुद्दा ऐरणीवर आणला आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार अशी ठाम भूमिका मतदारांनी खुल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे.केवळ रस्ते,वीज, पाण्याचा प्रश्न मिटल्यास मुंबई पुण्याहून थेट रेल्वे सेवा सुरु होऊन वीकेंड टुरिझमला मोठी चालना मिळेल.शिरोडा वेंगुर्ला देवगड मालवण यासारख्या पर्यटनस्थळावर पर्यटकांची संख्या वाढेल.एका खासगी सर्वेक्षणानुसार दररोज ५०० नवीन पर्यटक आले.तरी वर्षाला सुमारे ५४ कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते.याशिवाय येथे प्रस्तावित ३९ कोटींच्या रेल्वे बजेट हॉटेलचे काम निधीअभावी रखडले असून तेही पूर्ण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टिनेही हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.सद्या देवगडचा हापूस आंबा व वेंगर्ल्याचा काजू महागड्या ट्रकमार्गे वाशी मार्केटला पाठवावा लागतो.टर्मिनस सुरु झाल्यास रेल्वेमार्गे कमी खर्चात व कमी वेळेत मालवाहतूक शक्य होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढेल.तरुणांसाठी स्थानिक रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत म्हणूनही टर्मिनसकडे पाहिले जात आहे.गाड्यांची सफाई पाणी भरणे देखभाल आदी कामांतून स्थानिकांना रोजगार मिळेल. एक स्थानक एक उत्पादन या योजनेमुळे महिला बचत गट व लाकडी खेळणी व्यवसायाला कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध होईल . दरम्यान टर्मिनससाठी आवश्यक असलेला अप्रोच रोड सुमारे ९० टक्के पूर्ण झाला असला तरी पाण्याचा प्रश्न अद्याप लालफितीत अडकलेला आहे.तिलारी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत १५ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास टर्मिनससह मळगाव,कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.गेल्या दहा वर्षात केवळ भूमिपूजन झाल्या असून आता प्रत्यक्ष पूर्तता हवी,असा निर्वाणीचा इशारा मतदारांनी दिला आहे.जो उमेदवार आपल्या अधिकृत जाहिरनाम्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व रेलोटेल प्रकल्प पूर्ण करण्याचे स्पष्ट वचन देईल आणि निवडून आल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करेल,त्यालाच मत दिले जाईल,असा निर्धार या खुल्या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.कोकणच्या स्वाभिमानाशी जोडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या व्हिजन मध्ये याला अग्रक्रम द्यावा,अशी अपेक्षा सिंधुदुर्गातील मतदार व्यक्त करत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.