आरसीबीचे नेतृत्व पुन्हा विराट कोहलीकडे?
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेद्दाहमध्ये नुकत्यात झालेल्या आयपीएल महालिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 19 खेळाडूंना खरेदी करताना त्यांची रणनीती स्पष्ट दिसत होती. फ्रँचायजी कर्णधारपदा पर्यायासाठी फारशी हताश झालेली नव्हते. मात्र बोली लावताना त्यांनी हुशारी दाखवली. या आगामी आवृत्तीसाठी विराट कोहलीकडे पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा सोपविली जाणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.
दोन दिवस झालेल्या या लिलावात आरसीबीने खरेदी केलेल्या खेळाडूंत जोश हॅझलवूड सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला 12.50 कोटी रुपयांना आरसीबीने आपल्या संघात सामील करून घेतले. रिषभ पंत व केएल राहुल हे कर्णधारपदाचे दोन पर्याय त्यांना मिळू शकले असते. पण त्यांची किंमत हॅझलवूडपेक्षा जास्त होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. त्यांनी अनुक्रमे 11 कोटी व 10.50 कोटी यापेक्षा जास्ती बोली लावली नाही.
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार होणार आहे. 19 खरेदी केलेले व तीन राखून ठेवलेले असे एकूण 22 सदस्यीय संघ पाहिल्यास तसेच संकेत मिळत आहेत. त्यांनी पंत व राहुलसाठी बोली लावल्या. पण त्यांना संघात घेण्याबाबत ते फार आग्रही नव्हते. कर्णधारपदाचे पर्याय म्हणून नव्हे तर प्रमुख संघ बनवण्यासाठीच त्यांनी त्यांच्यासाठी बोली लावल्या होत्या आणि श्रेयस अय्यरला तर त्यांनी बोलीही लावली नाही. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
पंत व राहुलसाठी आरसीबी प्रारंभी आग्रही दिसले. पण 10 कोटीची मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांनी बोली लावणे थांबवले आणि लखनौ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात त्यांना घेण्यासाठी लागलेली चुरस पाहत बसले. वरील तीन संघ पंतसाठी आग्रही होते तर दिल्ली, केकेआर व चेन्नई सुपर किंग्स राहुलला सोडण्यास तयार नव्हते. माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस सात कोटीपेक्षा कमीमध्ये पैशांत आरसीबीला मिळू शकला असता. मागील वेळेस ते त्याला 7 कोटी देत होते. पण त्यांनी नव्या मोसमासाठी बलाढ्या संघ निवडणे पसंत केले. या संघाला अद्याप आयपीएल स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली ही कसर भरून निघेल, अशी ते आशा करीत आहेत. पहिल्या आवृत्तीपासूनच कोहली आरसीबी संघातून खेळत आहे.
आधीच्या वृत्तानुसार, कोहलीने संघ व्यवस्थापनाची चर्चा करून नेतृत्त्वाची भूमिका पुन्हा स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्याने 2013 ते 2021 या या कालावधीत आरसीबी संघाचे नेतृत्व केले होते. या संघाने चारदा प्लेऑफमध्ये स्थान मिळविले तर 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत सनरायजर्स हैदराबादकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याने ते जेतेपदापासून वंचितच रहावे लागले होते. कर्णधार कोहली व खेळाडू कोहली या दोन्ही भूमिकांत त्याला यश मिळाले नाही. 2025 मध्ये तरी जेतेपदाचे स्वप्न साकार होते का, हे पाहणे मनोरंजक ठरेल.