For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेर्णा दुर्घटनेतून डोळे उघडणार का?

06:20 AM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
वेर्णा दुर्घटनेतून डोळे उघडणार का
Advertisement

वाळलेल्या गवताला लागलेली आग सर्व्हिस सेंटरच्या बाहेर पार्क केलेल्या महागड्या कारपर्यंत पोहचली व तब्बल 33 कार जळून खाक झाल्या. त्यामुळे कोट्यावधी रूपयांची हानी झाली. एकाच वेळी 33 कार जळून खाक होण्याची ही पहिलीच घटना होय. यापूर्वीही गोव्यात वाहनांना आग लागलीय. पण, एवढ्या मोठ्या संख्येत कारची हानी कधीच झाली नाही. या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

Advertisement

गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व या घटनेला सर्व्हिस सेंटर जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. या घटनेतून डोळे उघडले पाहिजे, असेही त्यांनी म्हटलेय.

गेल्या तीन-चार वर्षांपासून सर्व्हिस सेंटरच्या बाहेर कार पार्क करण्यात आल्या होत्या व त्या हटविण्याची नोटीस सर्व्हिस सेंटरला बजावली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कार तशाच पार्क करून ठेवल्याने ही घटना घडली. जर नोटीस मिळताच उपाययोजना आखली असती तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. आता या सर्व्हिस सेंटरवर कारवाई केली जाणार असल्याचे गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

ज्या वेर्णा औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली ती राज्यातील सर्वात महत्त्वाची औद्योगिक वसाहत. या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी त्यांचे असोसिएशन देखील कार्यरत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील समस्यांकडे या असोसिएशनचे लक्ष असणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

वाळलेले गवत वेळीच कापून टाकले असते तर अशी मोठी दुर्घटना घडली नसती. ‘ग्रास कटर’चा वापर करून हे गवत पावसाळ्यानंतर त्वरित तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असे दोन वेळा कापून टाकले असते तर आगीच्या घटना टाळणे शक्य असते. ग्रास कटरद्वारे गवत कापण्यासाठी फार मोठा खर्चही येत नसतो. हे काम औद्योगिक असोसिएशनने हाती घेणे आता महत्त्वाचे बनले आहे.

आजही या औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत असून पुन्हा आगीची घटना घडली तर आणखी दुर्घटनेची भर पडू शकते. त्यापूर्वीच उपाय योजना आखणे महत्त्वाचे बनलेय. मंगळवारच्या घटनेनंतर वेर्णा औद्योगिक वसाहतीतील सर्व इंडस्ट्रीजना आजूबाजूचे वाळलेले गवत कापण्याचा आदेश दिल्याची माहितीही गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिलीय.

गोव्यातील बहुतेक औद्योगिक वसाहती या पठारावर आहेत व या पठारांवर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात गवत उगवते. हे गवत जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत वाळते. वाळलेल्या गवताला आग लागली की, आग वेळीच नियंत्रणात आणणे कठीण जाते. अग्निशामक दलाला ही धावपळ करावी लागते. हे गवत कापण्याचे एक नियोजन केले तर आगीच्या दुर्घटना टाळणे शक्य आहे. प्रत्येक औद्योगिक वसाहतीत तेथील इंडस्ट्रीजच्या मालकांची असोसिएशन्स आहेत. त्यांना याकामी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. गोवा औद्योगिक वसाहत महामंडळाने सर्व असोसिएशनची तातडीची बैठक बोलावून आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी सूचना व उपाययोजना आखण्याची कल्पना दिली पाहिजे. याकामी सहकार्य करत नसेल तर कठोर कारवाई करण्याची तयारीही ठेवली पाहिजे.

सुदैव असे की, कार आगीच्या दुर्घटनेत अनुचित प्रकार घडला नाही. ही घटना ज्यांनी प्रत्यक्षात पाहिली व सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. यात किती कार त्याठिकाणी दोन-तीन वर्षांपासून पडून होत्या व किती कार नव्याने आणून ठेवल्या हे सर्व्हिस सेंटरच्या मालकालाच ठाऊक असणार. अशा कार ठेवताना सर्व्हिस सेंटरने दक्षता घेतली नव्हती हे आगीच्या दुर्घटनेतून स्पष्ट झाले. आग लागली तर ती त्वरित विझविण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीच साधनसुविधा नव्हती हे देखील उघड झाले. शेजारील आस्थापनातील कर्मचारी आग विझविण्यासाठी धाव घेतात व सर्व्हिस सेंटरचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेतात असा आरोपही त्यांच्यावर झालेला आहे. या घटनेला सर्वस्वी सर्व्हिस सेंटर जबाबदार ठरलेय.

गेल्यावर्षी उत्तर गोव्यातील एका कंपनीत आगीची दुर्घटना घडली होती. भयानक आग लागून कंपनीची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. गोव्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये दुर्घटना घडत असतात. मात्र, त्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. यापूर्वी वेर्णा औद्योगिक वसाहतीत एका फार्मा कंपनीत दोन कर्मचाऱ्यांचा गुदमरून बळी गेला होता. तसेच फॅक्टरीत स्फोट होऊन कर्मचारी दगावण्याचे प्रकार ही घडले आहेत. दक्षिण गोव्यातील कुंकळळी औद्योगिक वसाहतीत अशा अनेक घटनांची नोंद झालेली आहे. बिगर गोमंतकीय कर्मचारीवर्ग असल्याने, त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही.

कर्मचारीवर्ग बिगर गोमंतकीय की स्थानिक हे महत्त्वाचे नसून कर्मचारी सुरक्षा महत्त्वाची आहे व त्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.