For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काका-पुतणे एकत्र येणार का?

06:56 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
काका पुतणे एकत्र येणार का
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनोमिलनाचे वारे वाहत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीतील दोन गटांचे एकत्रीकरण यावर चर्चा होताना दिसत आहे. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा वर्धापन दिन पुण्यात होत आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी एकत्रीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय होईल, असे सुचक वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.`, अशी इच्छा अजित पवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती आणि त्यानंतर एक महिन्याच्या आत 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.

Advertisement

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील 30 आमदारांसह भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अजित पवार यांनी आपलाच मूळ पक्ष राष्ट्रवादी असल्याचा दावा केला. घड्याळ चिन्ह देखील अजित पवारांना मिळाले. सुरूवातीला अजित पवारांचा शरद पवारांसमोर टिकाव लागणार नाही असे वाटत होते, लोकसभा निवडणुकीत सुनिल तटकरे वगळता अजित पवार स्वत:च्या पत्नीला देखील निवडून आणू शकले नाहीत.

शरद पवारांचा लोकसभेतील परफॉर्मन्स हा थक्क करणारा होता, मात्र विधानसभेला अजित पवारांनी शरद पवारांवर मात करत तब्बल 41 आमदार निवडून आणले. शरद पवारांच्या बालेकिल्यातच अजित पवारांनी चमकदार कामगिरी केली. सातारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा, कायम पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा जिल्हा म्हणून साताऱ्याची राजकीय ओळख, पक्षाची स्थापना झाल्यानंतर 1999 ला झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत जिह्यातील 10 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले.

Advertisement

मात्र 2024 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला एकाही जागेवर यश मिळाले नाही. शरद पवारांच्या पक्षाच्या अपयशाचे विश्लेषण करताना, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी खूप चांगले उमेदवार दिले.

अहिल्यानगर (अहदमनगर) लोकसभा मतदार संघातून निलेश लंकेसारखा उमेदवार दिला, मात्र विधानसभेला लगेच राणी लंपेंना उमेदवारी देणे ज्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे, जे त्या भागातले संस्थानिक आहेत किंवा त्यांचा संस्थानिकांशी संबंध आहे. त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना नाकारण्यात आले, जे दहा आमदार निवडून आले, त्यातील रोहीत पवार, रोहीत पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, मोहीते-पाटलांच्या आशिर्वादाने निवडून आलेले उत्तमराव जानकर बघता लक्षात येते. अजित पवारांनी मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या मदतीने स्थानिक पातळीवरील बाजार समिती, सहकारी साखर कारखाने सगळ्याच निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे वर्चस्व सिध्द केले. त्यामुळे अजित पवारांनी बंड केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांसोबत असणाऱ्यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवारांसोबत जमवून घेण्याचा निर्णय घेतला.

येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर शरद पवारांच्या पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ येऊ शकते. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत, वाईमध्ये झालेल्या राजकीय सभेमध्ये बोलताना साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असा शब्द दिला आणि हा शब्द अजित पवारांनी पूर्ण केला. विधानपरिषदेवर पण त्यांनी पक्षातील प्रस्थापितांना डावलून निष्ठावंताना संधी दिली. सध्या शरद पवारांच्या पक्षांचे आमदार त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या आमदारांचे एकूण संख्याबळ बघता, यापुढे विरोधकांचा विधानपरिषदेवर आणि राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खडतर असणार आहे. त्यामुळे विरोधीपक्षाला सध्या तरी पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान समोर आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत की, ज्यांची जन्मतारीख ही 22 जुलै आहे. अजितदादा हे फडणवीसांचे ब्लू आईड बॉय असल्याने, मुख्यमंत्र्यांनी दादांना नेहमीच फ्रि हॅन्ड दिला. दादांचा कामाचा आवाका, प्रशासनावरील पकड याचे मुख्यमंत्री नेहमीच कौतुक करताना दिसतात. त्यातच अर्थखाते दादांकडे असल्याने शिवसेना शिंदेगटाचे आमदार देखील अजितदादांकडून निधीवाटपाबाबत अन्याय होत असल्याची तक्रार करतात. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीला मुख्यमंत्री आणि नंतर गृहखाते मिळावे यासाठी केलेले दबावतंत्र हे भाजपमधील वरीष्ठ नेत्यांना आवडलेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे शह देऊ शकले नाही, त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला चांगलाच सुरूंग लावला. जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोवर अजित पवारांचे महत्त्व हे भाजपमध्ये राहणार आहे. तिकडे उध्दव ठाकरेंचा बालेकिल्ला असणारा कोकण आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.

मुंबईतही भाजपची ताकद ही शिवसेना शिंदे गटापेक्षा जास्त आहे. त्यामुळे भाजपला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या ताकदीचा चांगलाच अंदाज आला आहे. महायुतीच्या साथीने का होईना राज्यात अजित पवारांनी आपली राज्याच्या राजकारणावरची पकड सिद्ध कऊन दाखवली आहे हे मात्र नक्की आणि अजितदादांची हीच पकड शिंदेंसाठी त्यांचे राजकारणातील महत्त्व कमी करणारी ठरत आहे.

आज राष्ट्रवादीच्या दोन पक्षांचा पुण्यात वधार्पन दिन होत असताना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीपक्षाच्या विलीनीकरणाबाबत आज काय निर्णय होणार, पवार काका-पुतणे एकत्र येणार का? याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.