For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थी गळतीवर डॅमेज कंट्रोल होणार का?

11:56 AM Mar 10, 2025 IST | Pooja Marathe
विद्यार्थी गळतीवर डॅमेज कंट्रोल होणार का
Advertisement

महाविद्यालयातील वाढत्या अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठ अधिविभागातील प्रवेशावर परिणाम

Advertisement

कोल्हापूर : अहिल्या परकाळे

शिवाजी विद्यापीठातील अधिविभाग प्रवेश परीक्षेनंतर पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रांगाच्या रांगा लागायच्या. शेकडो विद्यार्थी वेटींगवर असायचे, अशी स्थिती गेल्या पाच-दहा वर्षात होती. परंतू अलीकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. काळानुरूप व्यवसायिक अभ्यासक्रमांना बहुतांश विद्यार्थी प्रवेश घेतात. याचा फटका शिवाजी विद्यापीठातील जवळपास सर्वच अधिविभागांना बसला असून विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत आहे. विद्यार्थी संख्या वाढीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होणार का? असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.

Advertisement

शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून विनाअनुदानित महाविद्यालयांना अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे. महाविद्यालयाची इमारत, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कशाचीच शहानिशा होत नाही. याचाच फायदा घेत ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांनी एम.ए., एम. एस्सी., एम. कॉम. यासह व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. काही महाविद्यालयात प्रवेश घेतला की महाविद्यालयाला न जाता उत्तीर्ण करण्याची जबाबदारी कॉलेज घेते. त्यामुळे अभ्यास न करता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी शहरातील विद्यार्थीही ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेवू लागले आहेत. याचा फटका शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांना बसू लागला आहे. एम. एम., एम. कॉम., एम. एस्सी. यासह व्यवसायिक अभ्यासक्रमांचीही विद्यार्थी संख्या घटली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालय स्वायत्त झाली, अभ्यासक्रम तयार करून परीक्षाही तेच घेतात. याचा फायदा अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असल्याने विद्यार्थी संख्या घटत आहे, असा सवाल अधिसभेत अभिषेक मिठारी यांनी उपस्थित केल्यानंतर समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण महाजन असून ही समिती विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नशील आहे. परंतू पारंपारिक अभ्यासक्रमांना विद्यार्थी संख्या वाढणार का? हा प्रश्न मात्र कायम आहे.

रोजगाराच्या कमी संधी
पदव्या मिळवूनही रोजगाराच्या संधी नसल्याने तरूणांमध्ये अस्वस्थता आहे. एमएस्सी, एम. फिल., पीएच. डी., सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होवूनही नोकरीचा पत्ता नाही. वय निघून चालले तरी जगण्यापुरत्या पैशाची नोकरी मिळत नाही. मग असे शिक्षण घेवून काय करायचा असा प्रश्न तरूणाईला पडला आहे. शासन, विविध खासगी कंपन्या, महाविद्यालय आणि विद्यापीठांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. परंतू शासन मात्र नोकरभरतीबंदी घालून रोजगाराच्या संधी कमी करीत, आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला देत आहे. शासनाने अनेक प्रकल्प हाती घेवून त्यावर बेरोजगार विद्यार्थ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

प्राथमिक स्वरूपात विभाग व प्रवेश
विभागाचे नाव                      क्षमता               प्रवेश               रिक्त जागा
बीजे                                       40                    13                      27
एमजे जर्नालिझम                      30                    12                      18
मास कम्युनिकेशन                    30                    16                     14
एमबीए                                   60                     55                       5
मास्टर ऑफ रूरर स्टडीज         60                    28                      32
मास्टर ऑफ सोशल वर्क            60                   49                      11
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी             18                   15                        3
अप्लाय केमेस्ट्री                        60                   15                      45
फिजिकल केमेस्ट्री                    20                   18                        2
एमएस्सी नॅनो सायन्स                35                   14                      21
एमएस्सी मॅथेमॅटिक्स                 30                     7                      23

विद्यार्थी संख्या वाढीसाठी सर्वोत्परी प्रयत्न
अधिविभागांची प्रवेश परीक्षा जाहीर झाली असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणात एमए, एमकॉम, एमएस्सीसह व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे सर्वच अधिविभागांची प्रवेश क्षमता पूर्ण करू शकत नाही.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)

विनाअनुदानित महाविद्यालयांवर नियंत्रण
विद्यार्थी संख्या का कमी होत आहे याचा शोध घेऊन ती वाढावी यासाठी विद्यापीठाने तज्ञ समिती गठित केली. या तज्ञ समितीने विविध उपाय योजना सुचवलेल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू शकेल. तसेच रोजगार संधी निर्माण करणारे अभ्यासक्रम अभ्यास मंडळांनी तयार करणे महत्त्वाचे आहे. परवानगी दिलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांवर नियंत्रण हवे.
अॅङ अभिषेक मिठारी (अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ)

Advertisement
Tags :

.