अतिक्रमण कारवाईत सातत्य राहणार काय
नागरीकांची विचारणा, शहर कधी घेणार मोकळा श्वास
कोल्हापूर
शहरातील रस्ते वाहतूकीसाठी आहेत की, अनधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी आहेत. असा प्रश्न नागरीकांना पडत आहे. रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत आहे. महापालिका आणि शहर वाहतूक शाखेने शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. मात्र ही मोहिम फक्त सुरु होवून थांबणार की शहर अतिक्रमण मुक्त होवून मोकळा श्वास घेणार हे आता पहावे लागेल. या कारवाईमध्ये सातत्य ठेवून शहराला अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी नागरीकांच्यातून होत आहे.
शहरातील प्रमुख चौक व रस्ते हे सध्या अतिक्रमणांनी व्यापले आहेत. महापालिका परिसर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, खाउ गल्ली, सरस्वती टॉकीज परिसर, लक्ष्मीपुरी, शाहुपूरी यासह शहारातील विविध ठिकाणी अतिक्रमण झालेले आपल्याला दिसत आहे. शहरात सध्या दिसली रिकामी जागा की, टाक केबिन आणि टपरी आणि घाल दुकान अशी परिस्थिती आहे. शहरातील सर्वच प्रवेश रस्त्यांवर ही अवस्था आहे. अगदी शहराचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल ते कावळा नाका, शाहू टोलनाका ते विद्यापीठ हे रस्ते त्याला अपवाद राहिलेले नाहीत. त्यामुळे हे शहर टप्रयांचे शहर असल्यासारखी स्थिती आहे. पोटापाण्याचा व्यवसाय करायला कोणाची हरकत असायची कारण नाही. पण हा व्यवसाय करताना किमान प्रमुख रस्त्यातील वाहतुकीला अडथळा होणार नाही, याचे तरी भान राखायला हवे. रस्ता माझ्याच मालकीचा आहे, अशा थाटात काही फेरीवाल्यांचा आविर्भाव आहे. महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि पोलिस यांनी समन्वय ठेवून अतिक्रमणधारकांची रस्त्यावरची दादागिरी मोडली नाही तर मात्र अतिक्रमणांचे स्वरूप आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
शहराची लोकसंख्या
6 लाख
कामानिमीत्त येणारे नागरीक
2 ते 2. 50 लाख
वाहन संख्या
22 लाख
अधिकृत फेरीवाल्यांची संख्या
5 हजार 680
अतिक्रमण कारवाईत हवे सातत्य नको राजकीय हस्तक्षेप
शहरात महापालिकेच्या वतीने सध्या अतिक्रमण कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अतिक्रमण विभागाने सातत्य ठेवण्याची गरज आहे. अतिक्रमण विभगाची कारवाई नेहमीच आमवस्या पौर्णिमेप्रमाणे सुरु असते. यामुळे अतिक्रमण काढल्यानंतरही काही दिवसातच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभारण्यात येते. अतिक्रमण विभागातील काही कर्मचारीही ठराविक अतिक्रमणांना अभय देत असतात.
इमारतीच्या पार्किंगमध्ये थाटले हॉटेल
शहरातील काही बड्या इमारतीमध्ये हॉटेल थाटण्यात आले आहेत. इमारतीच्या पार्किंग स्पेस व ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे हॉटेल थाटल्याचे दिसत आहे. मात्र या हॉटेलना भागातील कारभाऱ्यांचे असणारे आर्थिक पाठबळ यामुळे या ठिकाणी कारवाई करण्याचे धाडस महापालिकेचा अतिक्रमण विभाग दाखवू शकत नाही. उपनगरात तर अशा हॉटेलची संख्या खूप आहे.
मनपा, शहर वाहतूक शाखा समन्वय हवा
महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक शाखा या दोघांमध्ये समन्वय असणे खूप आवश्यक आहे. या दोघांच्या समन्वयाने जर कारवाई केली तर ती कायम स्वरुपी राहते. शहरातील सिग्नलवर पट्टे मारणे, नो पार्किंगचे फलक उभारणे यासोबत अतिक्रमण हटवितानाही या दोनही विभागांनी एकामेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
सोमवारपासून कारवाई
शहरात हातगाडी, टपऱ्यांचे अतिक्रमण वाढल्यामुळे याचा परिणाम थेट वाहतूकीवर होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या मदतीने सोमवारपासून अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली. तसेच शहरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांना नोटीस लावण्यात आल्या असून, नोटीसीची मुदत संपल्यानंतर ते हटविण्यात येणार आहेत.