For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ऊसदर आंदोलनाचा आज सोक्षमोक्ष?

07:59 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊसदर आंदोलनाचा आज सोक्षमोक्ष
Advertisement

साखर कारखानदार-शेतकरी नेत्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावसह उत्तर कर्नाटकात ऊसदर आंदोलन भडकलेले असतानाच सोमवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत सुवर्ण विधानसौधमध्ये कारखानदार व शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघणार अशी अपेक्षा असून जर चर्चा फिसकटली तर ऊसदर आंदोलन भडकणार आहे.

Advertisement

दिल्ली येथील बैठकीनंतर शेतकऱ्यांनी महामार्ग रोको आंदोलन छेडले होते. दोन दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी हत्तरगी टोलनाक्यावरून पदयात्रा सुरू करण्यात आली होती. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वत: कित्तूरला येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर घेराव कार्यक्रम तूर्त स्थगित ठेवण्यात आला होता.

कित्तूर उत्सवात भाग घेण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बेळगावात आगमन झाले आहे. सोमवारी ऊसदर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सकाळी 11 वाजता साखर कारखान्यांच्या मालकांबरोबर मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने सौंदत्तीला जाऊन श्री रेणुका यल्लम्मा डोंगरावर विविध विकासकामांना चालना देऊन ते बेळगावला परतणार आहेत. दुपारी 3.30 वाजता ऊसउत्पादक शेतकऱ्यांबरोबर महत्त्वाची बैठक होणार आहे.

शेतकऱ्यांशी चर्चा करण्याआधी मुख्यमंत्री कारखानदारांबरोबर चर्चा करणार आहेत. राज्यात सध्या 77 साखर कारखाने कार्यरत आहेत. ऊसदर आंदोलनावर तोडगा काढल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. काही कारखाने सुरू झाले असले तरी त्यांना ऊसपुरवठा करण्यास शेतकरी उत्सुक नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा तिढा सोडवावाच लागणार आहे.

सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी भाग घेणार होते. काही अपरिहार्य कारणामुळे ते या बैठकीत भाग घेणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीत भाग घेऊन एमएसपी वाढविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी केली आहे.

कारखानदार व शेतकरी नेत्यांच्या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने सुवर्ण विधानसौधमध्ये सर्व तयारी पूर्ण केली आहे. या बैठकीत ऊसदर आंदोलनावर तोडगा निघणार, बैठक यशस्वी होणार, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोमवारच्या बैठकीत ऊसदराचा तिढा सुटणार की आंदोलन पुन्हा भडकणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. जर या बैठकीत निर्णय झाला नाही तर मंगळवार दि. 27 ऑक्टोबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Advertisement
Tags :

.