For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिह्यात बदलत्या राजकारणातही समझोता एक्स्प्रेस धावणार का ?

11:06 AM Nov 29, 2024 IST | Radhika Patil
जिह्यात बदलत्या राजकारणातही समझोता एक्स्प्रेस धावणार का
Will the Samjhauta Express run even with the changing politics in the region?
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

गेल्या दहा वर्षात महापालिका आणि जिल्हा परिषदेसह विधानसभा निवडणुकीतील मतांच्या गणितांचा आराखडा मांडत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची जिह्याच्या राजकारणाची गाडी धावत आहे. गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर या दोघांची जिह्याच्या राजकारणातील समझोता एक्सप्रेस सुसाट होती. त्यांना आमदार विनय कोरे यांचीही भक्कम साथ लाभली. गेल्या अडीच वर्षातील पक्षफुटीच्या तडाख्यातही या तिघांचा संस्थात्मक राजकारणात याराना कायम होता. आता राज्यात झालेलं सत्तांतर आणि महायुती-महाविकास आघाडीतील टोकाच्या संघर्षाचा परिणाम गोकुळ, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, बाजार समितीच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. पक्षीय राजकारणाची झुल बाजूला ठेवून संस्थात्मक राजकारणात या नेत्यांचा याराना राहणार काय? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात महाडिक गटाविरोधात पक्षीय राजकारण आणण्यात आमदार विनय कोरे आणि हसन मुश्रीफ यांचा सिंहाचा वाटा आहे. 2010 च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली मोट बांधली. त्यानंतर पाटील-मुश्रीफ आणि कोरे आघाडी महापालिकेच्या सत्ताकारणात कायम राहिली. येत्या तीन महिन्यात महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. ही निवडणूक काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीचा कस पाहणारी असेल. या निवडणुकीत शिवसेना म्हणजेच आमदार राजेश क्षीरसागर, महाडिक गट म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रपणे ताकदीने उतरतील. यापूर्वी या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील स्वतंत्र लढायचे, ठरवून काही जागांवर मांडवली करत, विरोधी आघाडीला नामोहरण करत निवडणुकीनंतर दोघे एकत्र येत होते. आतापर्यंतच्या महापालिकेच्या राजकारणात सतेज पाटील यांना भक्कम साथ देणारे आमदार मुश्रीफ यांची भुमिका नेमकी काय असणार?

Advertisement

जिह्याच्या राजकारणात गेम चेंजर ठरलेल्या 2021 च्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत, गोकुळमधील महादेवराव महाडिक, दिवंगत पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांची 33 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने 21 पैकी 17 जागांवर दणदणीत यश मिळवत विजयाचा झेंडा फडकावला. या निवडणुकीने झालेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे परिणाम जिल्हा बँक आणि बाजार समितीसह अनेक साखर कारखान्यांच्या निवडणुकीत दिसले.

2021 मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग, गोकुळ दूध संघातील सत्तांतर, जिल्हा परिषदेच्या राजकारणाने बदललेली कूस आणि विधान परिषद निवडणुकीचे एकत्रित पडसाद जिल्हा बँकेच्या राजकारणात उमटले होते. जागावाटपातील नाराजीवरुन तत्कालीन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आघाडीत असूनही स्वतंत्र पॅनेल केले. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी साथ दिल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्हा बँकेत एकहाती सत्ता आली.

वडगाव बाजार समितीच्या डिसेंबर 2021 च्या निवडणुकीत कोरे-महाडिक-आवाडे-शेट्टी-यड्रावकर-हाळवकर गट एकत्र आले होते. जिह्याचे राजकारण तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या एककेंद्री सत्तेच्या बाजूने झुकत असतानाच बाजार समितीच्या निमित्ताने घटक पक्षांनी एकत्र येत राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे संकेत देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत तो यशस्वी करुन दाखवला होता. भाजपच्या झेंड्याखाली राज्यातील सत्तेत सहभागी नेते बाजार समिती निवडणुकीत एकत्र येतील, ही आशा मात्र यावेळी मावळली होती. कोल्हापूर बाजार समितीची 2015 ची निवडणूक तिरंगी झाली होती. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची एक आघाडी तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांची आघाडी तसेच प्रा. संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, राजू शेट्टी, भाजप मित्रपक्ष यांची तिसरी आघाडी असा तिरंगी सामना झाला होता. त्यात मुश्रीफ-कोरे आणि सतेज पाटील आघाडीने 19 पैकी 16 जागा जिंकत बाजी मारली होती. त्यानंतरच्या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताबदलाचे परिणाम म्हणून आमदार विनय कोरे आणि प्रा. संजय मंडलिक यांच्या साथीने भाजप तगडे आव्हान देईल. भाजप-शिंदे गट शिवसेना मित्रपक्ष आघाडी भक्कम असल्याचे संकेत बाजार समितीच्या राजकारणातून देण्याची शक्यता होती. मात्र, कोरे आणि मंडलिक यांनी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना साथ दिल्याने विरोधी आघाडीच्या कथीत व्युहरचनेला तडा गेला.

गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणाप्रमाणेच बाजार समितीच्या राजकारणात विनय कोरे आणि संजय मंडलिक यांना आपल्या सोबत ठेवण्यात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना यश आले. जिल्हा बँक निवडणुकीचा पॅटर्न बाजार समितीची रणनिती ठरवता आखला गेला. तसेच प्रा. संजय मंडलिक सोबत राहतील, याची काळजी दोन्ही काँग्रेसनी घेतली. भाजपला बळ मिळू नये, यासाठी प्रा. मंडलिक आणि आमदार कोरे सोबत राहतील, ही खेळी यशस्वी करण्यात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना त्यावेळी यश आले होते. मात्र आता राज्यातील बदललेलं सत्ताकारण, महाविकास आघाडीचा झालेला सपाटून पराभव, सतेज पाटील यांचे जिह्यातील एकवटलेले विरोधक या पार्श्वभूमीवर जिह्यातील संस्थात्मक निवडणुकीत नव्याने फेररचना होण्याची शक्यता आहे.

पहिले टार्गेट गोकुळ दूध संघ...!

राज्यात सत्तांतराचे परिणाम ‘गोकुळ’च्या राजकारणावर होतील, अशी अटकळ बांधली जाते. सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना तर आताच्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात जोरदार फिल्डींग लावली होती. राज्यात सत्तांतर होताच, सतेज पाटील यांच्या विरोधात गोकुळमध्ये आघाडी उघडली जाण्याची शक्यता आहे. मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांची गोकुळमध्ये साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील वरीष्ठ नेत्यांनी त्यास समर्थन दिले तरच ‘गोकुळ’मध्ये लगेच सत्तांतर शक्य आहे, अन्यथा ‘गोकुळ’चा कारभार आहे तसाच सुरू राहील, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे.

समझोता एक्सप्रेस

कागलकर व बावडेकरांची दोस्ती राजकारणाच्या पटलावर घोड्याची अडीच घरांची चाल ठरत महापालिका निवडणुकीप्रमाणे ‘दे धक्का’ देणारी होती. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर दोघांचा राजकीय याराना अधिकच घट्ट झाला. 2019 मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी मनापासून आग्रही असलेल्या मुश्रीफांना त्यावेळी पदाने हुलकावणी दिली. पालकमंत्रीपद नसल्याची सल असूनही मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले नाहीत. गोकुळची निवडणूक एकदिलाने लढवली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना दुभंगली तरी दोघांनी मिळून बँकेत सत्तेच्या जोडण्या घातल्या. दरम्यान, राज्यात मागील दोन वर्षात झालेल्या सत्तांतर तसेच इडीची पिडा मुश्रीफ यांच्यामागे सुरू झाल्यानंतरही सतेज पाटील हे मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.

Advertisement
Tags :

.