इलेक्ट्रिक कार्सची विक्री 30 ते 40 टक्के वाढणार?
नव्या वर्षासाठी टाटा मोटर्सचा अंदाज : कंपनीचा भारतीय बाजारात दबदबा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार्स दाखल करण्यामध्ये आघाडी घेताना दिसत आहे. नव्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये देशात 30 ते 40 टक्के इतकी इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीमध्ये वाढ नोंदविण्याची शक्यता कंपनीने नुकतीच वर्तवली आहे. नव्या वर्षात कंपनीच्या 8 लाख रुपयांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत किंमतीच्या इलेक्ट्रिक कार्स बाजारामध्ये सादर केल्या जाणार आहेत. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन आणि इलेक्ट्रिक वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी ही माहिती दिली आहे.
इलेक्ट्रिक कार्समध्ये टाटाच भारी
देशात 2023 मध्ये इलेक्ट्रिक कार्सची विक्री 90 ते 95 हजार इतकी राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील इलेक्ट्रिक कार्सच्या एकंदर विक्रीमध्ये टाटा मोटर्सचा वाटा 80 टक्के इतका सर्वाधिक नोंदला गेला आहे. यंदा प्रवासी वाहनांची देशांतर्गत विक्री 41 लाखाच्या घरात राहू शकते, असेही चंद्रा यांनी सांगत वर्षाच्या आधारावर पाहता विक्रीत 7 ते 8 टक्के वाढ नोंदविली जाईल. वर्षाच्या सुरुवातीला टियागो इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मागच्या वर्षी नेक्सॉन ही इलेक्ट्रिक कार विक्रीमध्ये आघाडीवर राहिली होती. त्या तुलनेमध्ये टियागोची किंमत कमी आहे.
देशातील चार्जिंग केंद्राच्या संख्येमध्ये समाधानकारक वाढ होण्याची गरज चंद्रा यांनी व्यक्त केली आहे. इलेक्ट्रिक कार चार्जिंग केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्यास जास्तीत जास्त लोक इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतील.
.....तर चिंता दूर होईल
देशामध्ये सध्याला 85 टक्के इलेक्ट्रिक कार्स या 400 किलोमीटरचे अंतर पार करू शकतात. तर 400 किलोमीटरपेक्षा अधिक मायलेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स सादरीकरण करण्यात आल्यास चार्जिंग केंद्रांसंबंधीची कार खरेदीदारांची चिंता बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.