रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यास पुतीन तयार
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लवकरच भेट होऊ शकते. पुतीन नेहमीच ट्रम्प समवेत सर्व आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटण्यासाठी तयार आहेत असे उद्गार क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी काढले आहेत. तर ट्रम्प यांनीही पुतीन यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत युक्रेन युद्ध संपवू शकतो असे म्हटले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्याकडून ट्रम्प यांच्या ‘शांतता-प्रस्तावा’चे समर्थन करण्याचा आग्रह केला जात असताना या घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत पुतीन आणि ट्रम्प यांच्या बैठकीत युक्रेन युद्धावर मोठा निर्णय होऊ शकतो.
राष्ट्रपती पुतीन यांनी वारंवार आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संपर्कासाठी स्वत:ची तत्परता दाखविली असून यात डोनाल्ड ट्रम्पही सामील आहेत असे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पुतीन यांच्यासोबत एका बैठकीची तयारी सुरू आहे. युक्रेन युद्ध म्हणजे रक्ताळलेला संघर्ष असून तो संपविण्याची गरज आहे. पुतीन लवकच्रा युद्ध संपुष्टात आणू शकतात असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.
बैठकीच्या तारखेबद्दल निर्णय नाही
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन दोघांकडून बैठकीची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिका-रशिया संबंधांमध्ये हा महत्त्वाचा घटनाक्रम आहे. परंतु सध्या चर्चेसाठी कुठलीही कालमर्यादा ठरविण्यात आलेली नाही. पुतीन यांच्यासोबत चर्चा स्वत:च्या अध्यक्षपदाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये व्हावी अशी सूचना ट्रम्प यांनी केली होती. तर अमेरिकेकडून अद्याप संपर्कासाठी कुठलीही औपचारिक विनंती प्राप्त झालेली नसल्याचे पेस्कोव यांनी सांगितले.
दोन्ही नेते चर्चेस तयार
मागील वर्षी डिसेंबरमध्ये पत्रकार परिषदेत पुतीन यांनी युक्रेन मुद्द्यावर करार करण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांना मी कधी भेटणार हे माहित नाही, मी 4 वर्षांपासून त्यांच्यासोबत बोललो नाही, परंतु मी यासाठी कधीही तयार असल्याचे ट्रम्प यांनी नमूद पेले होते. तर ट्रम्प यांनी स्वत:च्या प्रचारमोहिमेदरमयन वारंवार युक्रेन युद्ध रोखण्याचे आश्वासन दिले होते. याचमुळे दोन्ही नेत्यांची भेट युद्धावर तोडगा काढण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. दोन्ही नेत्यांच्या चर्चेतून युद्धग्रस्त क्षेत्रात शांतता नांदण्याची आशा आहे.