रुपया पुन्हा मजबूत होईल का?
स्टेट बँकेचा रिसर्च अहवाल सांगतोय पुढची दिशा, अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत
नवी दिल्ली :
जागतिक बाजारपेठेत हालचाल सुरू आहे, डॉलर मजबूत आहे आणि रुपयावर सतत दबाव आहे. तोच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे जो 2013 मध्ये उठला होता. भारत पुन्हा त्याच स्थितीत उभा आहे का? पण एसबीआय त्यांच्या रिसर्च अहवालात एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो, यावेळी कहाणी वेगळी आहे. भीती मोठी आहे, पण पाया पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे.
700 अब्ज डॉलरचे कवच, तरीही रुपया कमजोर का?
भारताकडे 700 अब्ज डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे. तो 10 महिन्यांची आयात सहजपणे हाताळण्यासाठी पुरेसा आहे. अल्प मुदतीची कर्जेही मर्यादित आहेत. म्हणजेच, कागदावर सर्व काही मजबूत दिसत आहे. पुन्हा रुपया घसरत आहे. अहवालानुसार, ही कमजोरी दिसते तितकी नाही. खरे तर, बाजारातील अनिश्चितता आणि डॉलरच्या मागणीमुळे दबाव निर्माण झाला असल्याचेही या अहवालामधून सांगितले आहे.
तेल कंपन्या दबावाखाली?
दररोज तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात डॉलरची गरज असते. या मागणीमुळे बाजारात रुपयावर अतिरिक्त दबाव येत आहे. या कंपन्यांसाठी एक स्वतंत्र डॉलर विंडो तयार करावी, ही अहवालातील प्रमुख शिफारस आहे. असे झाल्यास, बाजारातील खरी मागणी आणि पुरवठा स्पष्ट होईल व रुपयावरील अचानक आलेला दबाव कमी होऊ शकतो.
बँकिंग प्रणालीत नवीन गोंधळ
रुपयाच्या कमजोरीने आणखी एक समस्या निर्माण होत आहे. आरबीआयच्या नवीन नियमांमुळे देशांतर्गत (ऑनशोर) आणि विदेशी (ऑफशोर) बाजारांमधील दरी रुंदावली आहे. यामुळे डॉलरची उपलब्धता अधिक कठीण होऊ शकते. विदेशी बाजारांमध्ये प्रीमियम वेगाने वाढत आहेत आणि बँकांना आपली स्थिती सांभाळताना संघर्ष करावा लागत आहे. अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, जर हे योग्यरित्या हाताळले नाही, तर एक नवीन संकट निर्माण होण्याचे संकेतही निर्माण होत असल्याची माहिती आहे.
आरबीआयला भूमिका बदलावी लागणार?
अहवालातून हे स्पष्टपणे दिसून येते की, आरबीआयला आता थोडी अधिक आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. केवळ वाट पाहून चालणार नाही. बाजारात अनावश्यक घसरण टाळण्यासाठी, गरज पडल्यास परकीय चलन साठ्याचा वापर करून रुपयाला आधार द्यावा लागेल. यासोबतच, व्यवस्थेतील तरलतेचा म्हणजेच रोख रकमेचा समतोल राखणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून पैशाच्या अचानक तुटवड्यामुळे परिस्थिती आणखी बिघडणार नाही. अहवालात असेही म्हटले आहे की, व्याजदर संतुलित ठेऊन बाजाराची स्थिरता टिकवण्यासाठी आरबीआयने ‘ऑपरेशन ट्विस्ट’ सारख्या उपाययोजनांचाही विचार करावा.