रो-रो बोटसेवेमुळे दापोली पर्यटनाला मिळेल 'संजीवनी' ?
दापोली / प्रतीक तुपे :
मुंबई ते जयगड, विजयदुर्ग, मालवण अशी समुद्रमार्गे रो-रो बोटसेवा लवकरच सुरू होत असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबई आणि दापोली दरम्यान समुद्रमार्गे रो-रो बोटसेवा सुरू झाल्यास येथील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल. रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय कोरोना काळापासून काहीसा मंदावला आहे. मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई ते दापोली अशी रो-रो सेवा दापोलीतील पर्यटनासाठी 'नवसंजीवनी' ठरु शकते.
जर अशी सेवा दापोलीला देखील मिळाल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला सर्वाधिक चालना मिळेल व जिल्ह्यात कमी येणारा मुंबईचा पर्यटक दापोलीत मोठ्या दाखल होईल व पर्यटन व्यवसायाला उभारी घेण्यास मदत होईल. रत्नागिरीतील गणपतीपुळे, दापोली तालुक्यात मुरुड, कर्दे, लाडघर, हर्णे, पाळंदे, आंजर्ले शिवाय गुहागरातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक अधिक आकर्षित होतात. परंतु दापोलीत येणारा पर्यटक हा पुणे येथील अधिक असून मुंबई येथून पर्यटक येत नसल्याची खंत हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक व्यक्त करतात.
- मुंबईतील पर्यटकांना खेचण्यासाठी प्रभावी उपाय
मुंबईतील धनवान पर्यटक जे सध्या अलिबाग किंवा गोव्याला जातात, त्यांना दापोलीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी आकर्षित करण्यासाठी सागरी मार्गाचा वापर करणे हा प्रभावी उपाय ठरू शकतो. सध्या दापोली तालुक्यात पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या जास्त आहे, तर मुंबईहून येणारे पर्यटक हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. याचा परिणाम म्हणून दापोलीतील पर्यटन व्यवसाय अपेक्षित वेगाने वाढत नाही. मात्र जर समुद्रमार्गे रो-रो सेवा सुरू झाली, तर मुंबईतील समृद्ध पर्यटक सहजपणे दापोलीत येऊ शकतील. या सेवेमुळे पर्यटकांची संख्या वाढेल. मुंबईतील उच्चभ्रू भागांतील जसे की मलबार हिल, कफ परेड, नेपीयन सी रोड पर्यटक ज्यांना वेगवान आणि आरामदायक प्रवास हवा आहे, त्यांना रो-रो सेवा आकर्षित करेल. यामुळे दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.
- प्रवास होईल अधिक सोयीस्कर
मुंबईहून दापोलीला रस्ते मार्गाने जाण्यासाठी बराच वेळ लागतो. शिवाय रस्त्यांची अवस्था पाहिली तर 'हा प्रवास नको रे बाबा' असे अनेक वेळा पर्यटनांच्या तोंडून ऐकण्यास मिळते. त्यामुळे रो-रो सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवास अधिक सोयीस्कर होईल. पर्यटक आपली वाहने घेऊन थेट जहाजातून दापोलीला पोहोचू शकतील. पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल, रिसॉ र्ट्स, रेस्टॉरंट्स आणि स्थानिक व्यवसायिकांना मोठा फायदा होईल. यामुळे दापोलीतील हॉ टेल व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय चांगली उभारी घेतील. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, ज्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होईल.
- जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राचे चित्र बदलेल
गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे रो-रो सेवेसाठी जेटी तयार आहे. या ठिकाणाहून दाभोळ येथे एक कि.मी.चे अंतर आहे. परंतु दाभोळ किंवा हर्णे येथे बांबा झाल्यास दापोली तालुक्याला सर्वाधिक लाभ होईल. परंतु उटंबर येथे जेटीला मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. या जेटीमुळे पर्यटनाचे चित्र पूर्ण बदलेल.
समुद्रमार्गे रो-रो सेवा सुरू झाल्यास, दापोली तालुक्यातील पर्यटनस्थळे केवळ पुणेकरांसाठीच नव्हे, तर मुंबईतील श्रीमंत पर्यटकांसाठीही आकर्षण ठरेल. यामुळे, सध्या डबघाईला आलेला हा व्यवसाय पुन्हा एकदा भरभराटीस येईल आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राचे चित्र पूर्णपणे बदलेल.
- मुंबईतील पर्यटकांमुळे खूप फायदा होईल
रत्नागिरी जिल्ह्यात पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मुंबईतील पर्यटक कमी असतात. ते सारे गोवा, अलिबाग या ठिकाणी जातात. त्यामुळे आपल्याकडील पर्यटन व्यावसायिकांना पुण्यातील पर्यटकांवर अवलंबून राहावे लागते. जर रो-रो बोटसेवा झाल्यास दापोलीच्या पर्यटनात भर पडेल.
- नरेश पेडणेकर, हॉटेल व्यावसायिक, लाडघर
- दापोलीतील पर्यटन बहरेल
मुंबई ते दापोली रो रो बोटसेवा सुरू झाल्यास दापोलीच्या पर्यटनाला चालना मिळेल. सध्या पुणे येथील पर्यटकांवर अवलंबून रहावे लागते ती परिस्थिती राहाणार नाही. सध्या पर्यटनामध्ये खूप समस्या आहेत. पर्यटक कमी येत आहेत. अनेक कारणांनी पर्यटन व्यवसाय नुकसानीत आहे. जर रो-रो बोटसेवा सुरू होऊन मुंबईतील पर्यटक दापोलीत दाखल झाल्यास पर्यटन व्यवसाय फुलेल.
- मंगेश मोरे, हॉटेल व्यावसायिक, कर्दे
- श्रीमंत पर्यटक येतील
मुंबई ते दापोली रोरो सेवा सुरू झाली पर्यटनाच्या दृष्टी ने फायदेशीर होईल. दक्षिण मुंबईतील श्रीमंत पर्यटक दापोलीकडे आकर्षित होतील आणि याचा फायदा दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना होईल.
- सचिन तोडणकर, हॉटेल व्यावसायिक, कर्दे