ऑक्टोबर बैठकीत आरबीआय व्याजदर वाढवणार ?
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक ऑक्टोबर महिन्यात व्याजदरात वाढ करु शकते असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची पुढील बैठक 5 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे. त्यात कदाचित रेपो दरात वाढीची घोषणा केली जाऊ शकते.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी बँकेकडे 10.3 लाख कोटी रुपयांची तरलता राहिली असून हा विक्रम मानला जात आहे. यासंदर्भात एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, याचा अर्थ आता समिती बैठक होईपर्यंत कोणतेही उपाय नव्याने करण्यात येणार नाहीत. रुपया दबावात होता, बाँड यिल्ड नव्या उंचीवर असताना बँकिंग क्षेत्रात तरलता असंतुलीत दिसून आली आहे. अशावेळी रिझर्व्ह बँकेकडे व्याजदरात वाढ करण्यावाचून गत्यंतर नसेल.
विदेशी चलन साठा उच्चांकावर
रिझर्व्ह बँकेला विदेशी चलन अनिवासी भारतीय जमा अर्थात एफसीएनआर (बी) यातून 127.2 अब्ज डॉलर्स प्राप्त झाले आहेत. 31 ऑगस्ट रोजी जमा करण्याची अंतिम मुदत संपली आहे. याने बँकेतील तरलता अधिक वाढण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे याचा परिणाम देशाच्या विदेशी चलन साठ्यावर सकारात्मक दिसला आहे. 28 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा 740.8 अब्ज डॉलर्सवर विक्रमी स्तरावर पोहचला आहे. याचदरम्यान विदेशी चलन मालमत्ता 9.34 अब्ज डॉलर्सने वाढत 600 अब्ज डॉलर्सपार पोहचली आहे.