मोर्चा पडणार महागात ?
केंद्रीय निवडणूक आयोग, एसआयआर आणि संबंधित विषयांवर लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विरोधी पक्षांनीही याचिका सादर केली आहे. ज्यांच्याकडे आपण न्याय मागत आहोत, त्यांच्यावरच मोर्चा काढून विरोधी पक्षांनी नेमके काय साध्य केले, हे आता त्यांचे त्यांनाच माहीत...
दिल्लीत सध्या आंदोलनांचे पेव फुटले आहे. या आंदोलनांचा मुख्य उद्देश जनतेचे काही भले व्हावे, हा आहे, की केवळ केंद्र सरकार अस्थिर व्हावे, असा आहे, या विषयी शंका वाटावी, अशी परिस्थिती आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य या संदर्भात नेहमी उच्चारले जाते. सरकारविरोधातील आंदोलनांचे एकवेळ राहू दे. पण सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेण्याचे कारण आणि त्यामागचा अंत:स्थ हेतू काही वेगळाच असल्याचे स्पष्ट होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेऊन त्यांना केंद्रीय निवडणूक आयोग आणि एसआयआर यांच्या विरोधात निवेदन देण्याचा घाट घातला होता. तथापि, सरन्यायाधीशांनी त्यांना भेटीसाठी वेळ देण्यास नकार दिला. नंतर 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयावरच मोर्चा नेण्यात आला. मोर्चा नेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका सादर करण्यात आली. त्या याचिकेत 14 चुका आणि त्रुटी निघाल्या. त्या दुरुस्त करण्यात दोन दिवस गेले. मग गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. त्याचप्रमाणे मोर्चाच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या याचिकेवरही सुनावणी झाली. तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्तांना कायद्याचे स्थायी संरक्षण देणाऱ्या कायद्याविरोधातील याचिकेवरही सुनावणी झाली. अशा प्रकारे गुरुवारचा दिवस न्यायालयीन आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत ‘बिझी’ ठरला. विरोधी पक्षांनी सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि तीन्ही आयुक्तांना नोटीसा काढल्या. तसेच आयुक्तांना संरक्षण देणाऱ्या कायद्याच्या विरोधातील याचिकेवरही संबंधितांना नोटीस काढली. वास्तविक, कोणत्याही याचिकेसंदर्भात ही कृती केली जातेच. त्यामुळे ही नेहमीची प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयात घडलेली महत्त्वाची घटना अशी की, न्यायालयाने राहुल गांधी यांना मोर्चासंबंधी चांगलेच फटकारले. न्यायालयावर कोणी दबाव आणू शकत नाही. आम्ही हस्तीदंती मनोऱ्यात राहतो, असे कोणी समजू नये. न्यायालयाबाहेर ते काय बोलतात आणि न्यायालयात काय बोलतात, हे आम्हाला माहीत आहे. आमच्यापासून काही लपू शकत नाही, अशी काही सूचक विधाने सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मोर्चाविरोधातील याचिकाकर्ते जेव्हा त्यांची बाजू मांडत होते, त्यावेळी केली. या विधानांचा नेमका अर्थ काय, हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच. पण हा मोर्चेकऱ्यांना दिला गेलेला इशारा मानण्यात येत आहे. याचिका सादर करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांपैकी एकाला त्याच्या वर्तनासंबंधी स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशीही सूचना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली. त्यांनी कोणत्या नेत्याचे थेट नाव घेतले नाही. पण ही सूचना राहुल गांधी यांना उद्देशूनच असल्याचा अर्थ काढला जात आहे. काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तांच्या अनुसार या संदर्भात राहुल गांधी आणि काही विरोधी पक्षनेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीसाही दिल्या आहेत. पण नोटीस दिली आहे की नाही, यासंबंधी निश्चित माहिती मिळत नसल्याने तो मुद्दा बाजूला ठेवला, तरी या मोर्चाची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. त्यामुळे हा मोर्चा राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांना महागात पडणार अशी चिन्हे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आणि एसआयआर यांच्या विरोधात आधी काही याचिका सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. नव्या याचिकाही याच याचिकांना जोडून घेतल्या जाणार असल्याने त्यांचीही सुनावणी त्याच दिवशी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे न्यायालयाने त्याच्या निर्णयासंबंधीच्या कागदपत्रांची मागणी केली आहेच. तेव्हा, आयोगालाही ही कागदपत्रे या सुनावणीच्या आधी काही दिवस सादर करावी लागतीलच. आयोगाची निर्णय प्रक्रिया घटनात्मक आहे, किंवा नाही, याविषयीचा खुलासाही या सुनावणीच्या माध्यमातून होणारच आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा का काढला, हा प्रश्न आहे. मोर्चा पाहून सर्वोच्च न्यायालय भयभीत होईल आणि ते आपल्या बाजूने निर्णय देईल, अशी काही समजूत विरोधी पक्षांनी करुन घेतली आहे की काय? काही कळावयास मार्ग नाही. पण तसा काही उद्देश असेल तर तो सफल होणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणावर मोर्चा पाहून नव्हे, तर कायदा आणि वस्तुस्थिती पाहून निर्णय देणार आहे. हे विरोधकांनाही माहीत असणारच. तरीही मोर्चा का काढला? हा प्रश्न उरतोच. दुसरी शक्यता ही की आपल्याजवळ केवळ आरोप आहेत. ते सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही. त्यामुळे न्यायालयात आपला टिकाव लागणार नाही, अशी खात्री विरोधकांना असावी. त्यामुळे आपला कमकुवतपणा झाकण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असावा काय, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. काहीही असले, तरी आता विरोधक आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यासाठी घोडामैदान दूर नाही. ‘दूध का दूध और पानी का पानी’ लवकरच होणार आहे. तोपर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा ही करावी लागणारच आहे.
