मंत्रिमंडळ विस्तारावेळीच मिळणार संधी?
कोल्हापूर :
महायुती सरकारचा उद्या गुरूवारी शपथविधी सोहाळा आहे. यावेळी महायुतीमधील वरीष्ठ नेत्यांसह अन्यही नेते मंत्रीपदी शपथ घेणार आहेत. यामध्ये कोल्हापुरातील केवळ हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावेळीच कोल्हापुरातील इतर आमदारांना मंत्रीपदी संधी मिळणार आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. मात्र दहा दिवस उलटून गेले तरीही राज्यात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. अखेर महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार, 5 डिसेंबर रोजी होणार आहे. यामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील प्रमुख नेत्यांसह 22 ते 34 जण मंत्रीपदी शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या पहिल्या संभाव्या यादीत कोल्हापुरातील एकमेव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. उर्वरीत इच्छुकांना मंत्रीमंडळ विस्ताराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, जनसुराज्यचे विनय कोरे, शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, चंद्रदिप नरके, प्रकाश अबिटकर यांच्यासह राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात मंत्रीपदासाठी रस्सीखेच आहे. भाजपचे अमल महाडिक यांनाही पक्षाने मुंबई बोलावून घेतले आहे. पहिल्या यादीत मुश्रीफ असल्याने त्यांची मंत्रीमंडळातील स्थान निश्चित आहे. उर्वरीत आमदारामधून कोणाला मंत्रीपदी संधी मिळणार तसेच पालकमंत्री कोण होणार याकडे नजरा असणार आहे.