नवे राजदूत चमत्कार घडवतील काय?
भारतातील अमेरिकन राजवटांची एक मोठी परंपरा आहे. आता भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून रुजू झालेले सर्जियो गोर हे या परंपरेचे पालन करून काही नवा चमत्कार घडवतील काय असा प्रश्न उभा केला जात आहे. खरे तर सर्जियो गोर यांचे भारतातील पदार्पण हे त्यांचा पायगुण किती चांगला आहे हे दाखवीत आहेत. त्यांच्या रुजू झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताकडे पाहण्याचा वक्र दृष्टिकोन सुधारत आहे.
खुद्द गोर म्हणतात त्याप्रमाणे भारत-अमेरिका दरम्यानची व्यापार बोलणी आता एका नव्या वळणावर उभी आहे आणि आर्थिक संबंध सुधारण्यासाठी दमदार पावले टाकली जाण्याची शक्यता दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोण आहेत सर्जियो गोर, यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील सार्वजनिक जीवनात कोणती कामगिरी केली आहे. त्यांच्या बौद्धिक चातुर्यामुळे दक्षिण आशिया आणि मध्य आशियात अमेरिकेचे संबंध सुधारण्यात किती मदत होईल, खरोखरच बिघडलेला सत्ता समतोल सुधारण्यात ते यशस्वी होतील काय असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
थोडा पूर्व इतिहास
सर्जियो गोर हे अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे बीए पदवीधर आहेत. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रातील त्यांची गती वाखाणण्यासारखी आहे. शिवाय त्यांनी रिपब्लिकन पक्षात केलेले कार्य सुद्धा प्रगल्भ आणि उबदार असेच आहे. या पूर्वानुभवाचा फायदा त्यांना दक्षिण आणि मध्य आशियात कार्य करताना होणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या कार्मिक कार्यालयात त्यांनी काम केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीची त्यांना चांगली जाणीव आहे. ते मूळचे रशियन असून ताश्कंद येथे त्यांचा जन्म झाला आहे. रशियातील साम्यवादाचा प्रभाव दूर झाल्यानंतर आता तेथील तरुण झपाट्याने अमेरिकन लोकसंस्कृतीमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचे सर्जियो गोर हे एक उदाहरण आहे. भारत-रशिया संबंध सुधारलेले असल्यामुळे गोर यांच्या या पार्श्वभूमीचा त्यांना भारताची भूमिका समजावून घेण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. एखादा राजदूत विशाल खंडप्राय देशात कार्य करताना किती प्रगल्भपणे आणि जबाबदारीने वागतात त्यावरच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची किनार अवलंबून असते. नव्या राजदूतांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, शिवाय त्यांना दक्षिण व मध्य आशियाची अधिकची जबाबदारी असल्यामुळे हे नवे सत्तापद त्यांच्या वाढत्या प्रभुत्वाचे द्योतक आहेच, शिवाय पाकिस्तान-अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका या देशातील अस्थिर राजकारण समजावून घेऊन त्यांना तेथील परिस्थिती सुद्धा हाताळावी लागणार आहे. ही तारेवरची कसरत गोर महोदय कशाप्रकारे करतात ते आता पहावयाचे आहे.
प्रमुख आव्हाने कोणती
अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्जियो गोर यांच्यापुढे सध्या प्रमुख आव्हान कोणते असेल तर ते भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्याचे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले टेरिफ कर कसे सुसह्य करता येतील, त्यांना मुरड घालून भारत-अमेरिका व्यापार कसा सुधारता येईल हा कळीचा मुद्दा आहे. शिवाय दोन्ही देशातील कृषी उद्योग, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण सुरक्षा आणि संरक्षण तसेच दहशतवादाचे उच्चाटन याबाबतीत सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी त्यांना नवी दमदार पावले टाकावयाची आहेत. याबाबतीत त्यांची बुद्धिमत्ता चातुर्य आणि कल्पकता या बाबी कसोटीवर उतरणार आहेत. पाकिस्तान सारख्या देशाचे खाण्याचे आणि दाखविण्याचे दात भिन्न आहेत, वर मैत्रीचे नाटक करावयाचे आणि आतून मित्राच्या पोटात खंजीर खुपसावयाचा हे उलटे उफराटे राजकारण यापूर्वी अमेरिकेने अनुभवले आहे. अमेरिकेशी गोडी गुलाबी करत करतच तिच्यावर मोठा दहशतवादी हल्ला ओसामा बिन लादेन यांनी केला होता. तेव्हा बुश कसे चुकले आणि ओबामा याने ती चूक कशी दुरुस्त केली हे सारे लक्षात घेऊन आता ट्रम्प यांच्याकडून त्या चुका पुन्हा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्जियो गोर यांना दूध पोळले म्हणून ताक फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यांना दक्षिण आणि मध्य आशियातील राजकारण समजावून घेतानासुद्धा अधिक काळजीपूर्वक अधिक समजूतदारपणे पावले टाकावी लागतील.
प्रगल्भ अशी समज
सर्जियो गोर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी केलेली निवेदने अभ्यासली असता त्यामध्ये त्यांची प्रगल्भ अशी बौद्धिक समज आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील आकलन क्षमता यांची जाणीव दिसून येते.
आंतरराष्ट्रीय राजकारणात जुनी समीकरणे बदलत आहेत, नवी प्रमेय मांडली जात आहेत आणि गेल्या दहा वर्षात भारत आशिया खंडातील एक बलशाली सत्ता म्हणून उदयास आला आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य तसेच जागतिक मुक्तव्यापार करार आणि जी-20 ब्रिक्स तसेच वाढ जी-7 इत्यादी शिखर परिषद यातील भारताचा सक्रिय सहभाग पाहता भारताकडून विश्वशांतीच्या संदर्भात अपेक्षा उंचावल्या आहेत. इस्रायल-हमास युद्ध आणि युक्रेन-रशिया युद्ध थांबविण्यासाठी सुद्धा भारताचे सक्रिय सहकार्य सर्जियो गोर घेऊ शकतात. व्हेनेझुएलातील संघर्ष असो की कंबोडिया-थायलंडमधील वाद असो, भारताने घेतलेली भूमिका ही शांतता आणि विकासाला नेहमीच पूरक राहिली आहे. त्यामुळे सर्जियो गोर भारताचा हा पवित्रा लक्षात घेऊन अमेरिकन राजकारणाशी त्याला कसे जुळवून घेतील यावरच त्यांची क्षमता अवलंबून असणार आहे. अमेरिकन राजकारणात आणि रिपब्लिकन पक्षात एक भारत विरोधी गट सतत कार्यरत असतो. हा गट भारत विरोधी हवा तापविण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. त्यांच्या दबावाला बळी न पडता सर्जियो गोर किती निर्णायक, किती वस्तुनिष्ठ भूमिका घेतात यावरच त्यांच्या नव्या कारकिर्दीचा खरा यशापयशाचा आलेख अवलंबून असणार आहे. त्यांनी चीन असो की रशिया यांच्या एकतंत्री दबावाला बळी न पडता भारताला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारत आणि अमेरिका ही जगातील दोन महान लोकशाही राष्ट्रे आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून चीनचे आक्रमण असो की भारतामध्ये कृषी क्रांती या सर्व बाबतीत अमेरिकेने भारताला केलेले सहकार्य हे निश्चितच नवे वळण देणारे ठरले होते. आता या सर्व पार्श्वभूमीवर सर्जियो गोर कोणकोणते पवित्रे घेतात, कोणती समीकरणे टाकतात यावर भारत अमेरिका संबंधांचा सुवर्णकाळ अवलंबून असेल.
समारोप
या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्जियो गोर यांच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, त्यांनी आता तत्काळ भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी मदत करावी. हा करार एकतर्फी नव्हे तर दोघांच्याही हिताचा कसा होईल हे पहावे. दुसरे म्हणजे बदलत्या जगात कृषी औद्योगिक प्रगती असो की शिक्षण संशोधन तसेच माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र, तसेच अंतराळ संशोधन आणि सागरी संशोधन या सर्व क्षेत्रात भारताच्या उजळ कामगिरीचे महत्त्व लक्षात घेऊन अमेरिकेने भारताबरोबर असलेले पूर्व संबंध अधिक यशोशिखरावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दृष्टीने विचार करता सर्जियो गोर यांचे इंद्रप्रस्थ नगरीतील आगमन हे नव्या सुवर्णपरंपरेची मळलेली वाट अधिक सुलभ करण्यात किती सकारात्मक राहते, यावरच हा संबंधांचा आलेखबिंदू अवलंबून असेल. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात भारत-अमेरिका मैत्रीचा अमृत कलश अधिक मधुर कसा होईल हे गोर महोदयांच्या चातुर्य आणि माधुर्य यावर अवलंबून असणार आहे. या कसोटीवर ते कसे उतरतात, यावरच त्यांच्या भावी कर्तृत्वाचा मंगल कलश अधिक प्रकाशमान होऊ शकेल. या पुढील काळात त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कसोटी ही इतिहासाची पाने बदलण्यासाठी पूरक आणि सहाय्यभूत ठरेल काय हाच खरा प्रश्न आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर