आता विना टॉवर चालणार मोबाईल नेटवर्क?
डी 2 डी यावर आधारीत येणार तंत्रज्ञान : दूरसंचार कंपन्यांना नफा होण्याचीही शक्यता
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांना लवकरच एक नवीन नेटवर्क मिळेल जे कोणत्याही मोबाइल टॉवरशिवाय काम करणार आहे. म्हणजेच, जंगल, पर्वत, वाळवंट किंवा गावातील दुर्गम असणाऱ्या भागातही कॉल करण्यासोबत मेसेज करण्याची सोय होणार आहे तसेच इंटरनेट वापरता येणार आहे, तेही त्यांच्या विद्यमान फोनवरून, नवीन सॅटेलाइट फोन खरेदी न करता. या तंत्रज्ञानाला डायरेक्ट-टू-डिव्हाइस (डी2डी) म्हणतात, ज्यामध्ये मोबाइल थेट उपग्रहाशी जोडला जातो. ते भारतात प्रथम व्होडाफोन आयडिया (व्हीआय) द्वारे लाँच केले जाईल, ज्याने यूएस-आधारित एएसटी स्पेसमोबाइलशी भागीदारी केली आहे. एएसटी स्पेस मोबाईल ही अमेरिकेतील सर्वात मोठी उपग्रह कंपनी आहे,
ज्यामध्ये गुगल, एटी अँड टी, वेरिझोन, व्होडायोन पीएलसी सारख्या दिग्गजांनी गुंतवणूक केली आहे. कंपनीने आतापर्यंत 6 लो-अर्थ ऑर्बिट उपग्रह लाँच केले आहेत आणि एकूण 243 उपग्रह पाठवण्याची योजना आहे. व्हीआय आणि एएसटीची भागीदारी भारतातील अशा भागात डी2डी नेटवर्क प्रदान करण्यासाठी आहे जिथे मोबाईल टॉवर नाहीत आणि नेटवर्क खूप कमकुवत आहे. यासाठी वापरकर्त्यांना नवीन फोन बदलावा लागणार नाही किंवा त्यांना सॅटेलाइट डिव्हाइस खरेदी करावे लागणार नाही. यामध्ये आता स्टारलिंक, जिओ आणि एअरटेल देखील स्पर्धेत आहेत. या क्षेत्रातील स्पर्धा प्रचंड आहे. एलॉन मस्कची स्टारलिंक, अॅपलची ग्लोबलस्टार, अॅमेझॉनची कुइपर, लिंक ग्लोबल आणि इरिडियम सारख्या कंपन्या देखील भारतात डी2डी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहेत.
अॅपल वापरकर्त्यांना देखील फायदा होईल
अॅपलची नवीन आयफोन मालिका (आयफोन 14 आणि नंतरचे मॉडेल) आधीच ग्लोबलस्टारद्वारे उपग्रह कनेक्टिव्हिटीला समर्थन देते. भारतात सुमारे 5 कोटी आयफोन वापरकर्ते आहेत, जे डी 2 डी द्वारे एसओएस आणि मेसेजिंग सारख्या सेवा वापरू शकतात.
ही सेवा किती महाग आहे?
एका टेलिकॉम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सुरुवातीला, सुमारे 5 टक्के स्मार्टफोन वापरकर्ते ही सेवा स्वीकारतील. ही सेवा आंतरराष्ट्रीय रोमिंगसारखी प्रीमियम असेल-म्हणजे तुम्हाला थोडे महाग पॅकेज मिळेल, परंतु भरपूर सुविधा मिळतील. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना 10-15 टक्केपर्यंत अतिरिक्त महसूल देखील मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.