For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापौर भाजपचा की ठाकरेंचा

06:52 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
महापौर भाजपचा की ठाकरेंचा
Advertisement

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून असलेली ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता भाजप महायुतीने उलथवून लावली. ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच असेल, असे जाहीर केले होते. त्यामुळे सुऊवातीला मुंबईचा महापौर हिंदू होणार, असे बोलणाऱ्या भाजपला नंतरच्या टप्प्यात मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होईल, हे स्पष्ट करावे लागले आहे. आता भाजपने मुंबई जिंकल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Advertisement

2026 हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, येत्या शुकवारी म्हणजे 23 जानेवारीला बाळासाहेबांची जयंती आहे. 23 जानेवारी 1926 रोजी जन्मलेल्या बाळासाहेबांनी मुंबईच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवली होती, अनेक दशके या महापालिकेवर शिवसेनेचा प्रभाव राहिला. मात्र आता 25 वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता संपुष्टात येणार आहे. केवळ काही मिनिटात मुंबई बंद करण्याची ताकद ही बाळासाहेबांच्या आदेशात होती, त्याच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई महापालिकेवर शिंदे यांच्या साथीने भाजपची सत्ता आली आहे. भाजपने 89 आणि शिंदे सेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या महापौर पदावर भाजपचा दावा आहे. मात्र, शिंदे सेनेच्या काही नेत्यांनीही मुंबईच्या महापौरपदावर दावा ठोकला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उध्दव ठाकरे यांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. भाजपसाठी मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी, प्रशासनावर नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय ताकद. त्यामुळे भाजप महापौरपद सहजासहजी सोडायला तयार होणार नाही. मात्र, शिंदे गटाशिवाय भाजपचे महापौर पदाचे स्वप्न पूर्ण होत नसल्याने भाजपलाही तडजोडीचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे. भाजपकडे एका नव्हे तर दोन शिवसेनेचा सध्या पर्याय उपलब्ध आहे.

मुंबईसोबतच इतर महापालिकांमध्ये देखील भाजप आणि दोन्ही शिवसेना यांच्यात सत्तेत बसण्यासाठी तडजोडी सुरू आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शिवसेना-भाजप महायुतीत लढल्याने ठाण्यात 131 जागांपैकी 69 जागांवर शिवसेना तर भाजपला 28 जागांवर यश मिळाले. आता ठाण्यात शिंदेंचा महापौर बसणार हे नक्की झाले आहे, मात्र बाजुच्या कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर या महापालिकांमध्ये महायुतीत लढलेल्या शिवसेना भाजपात मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांना बहुमतासाठी ठाकरेंच्या 11 नगरसेवकांची मदत लागणार आहे. ठाकरेंच्या नगरसेवकांना फोडण्याची शिंदे यांनी तयारी केली असून, याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याचे बोलले जात आहे. शिंदे कल्याण -डोंबिवलीत ठाकरेंचे नगरसेवक फोडणार असताना, ठाकरेंनी मुंबई महापौर निवडीच्या वेळी उध्दव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचा प्रस्ताव देत, शिंदे यांच्या 29 नगरसेवकांच्या पाठिंब्याची हवाच काढून टाकली आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये ही शिंदे यांच्या 29 नगरसेवकांची भावना असल्याचे सांगितले, त्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचा होणार की ऐनवेळी काही धक्कातंत्राचा वापर होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपचा महापौर झालाच तर मुंबईत ठाकरे बंधूंच्या आवाहनानंतर एकवटलेल्या मराठी माणसात एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मुंबईत भाजपचा महापौर बसल्याची भावना निर्माण होणार, मुंबईतील निवडणूक निकाल बघता शिवसेना ठाकरे गटाला मराठी मतदारांनी तर भाजपला बिगर मराठी मतदारांनी साथ दिली. शिंदेंची शिवसेना महायुतीत लढत असल्याने भाजपच्या साथीने 29 जागांवर तरले. एकनाथ शिंदे ज्या ज्या महापालिकेत स्वबळावर भाजपच्या विरोधात लढले, त्या नवी मुंबई, पनवेल आणि मिरा भाईंदर महापालिकेत भाजपने शिंदेंचा सुपडा साफ केला आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे या बालेकिल्यात देखील शिंदेंनी महायुतीत लढण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या फायद्याचा ठरला. भाजपने ठाण्यात महायुतीत लढताना 39 जागा लढवताना 28 जागांवर यश मिळवले, हा भाजपचा स्ट्राईक रेट बघता, आज उध्दव ठाकरेंची मुंबईतील सत्ता गेली, पुढे शिंदेंची ठाण्यातील जाऊ शकते. महायुतीत लढल्याने बालेकिल्ल्यात शिंदे बचावले, अन्यथा अजित पवारांची पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जी गत झाली तीच शिंदेंची झाली असती. भाजपच्या गणेश नाईक, प्रशांत ठाकुर, नरेंद्र मेहता यांनी आपल्या महापालिकांचे गड सांभाळले, मात्र शिवसेनेच्या मंत्री असलेल्या प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट यांना स्वत:चा बालेकिल्ला सांभाळता आलेला नाही. माजी आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, राहुल शेवाळे या नेत्यांच्या नातेवाईकांना देखील मतदारांनी ठाकरेंच्या समोर नाकारले, त्यामुळे शिंदेंच्या उमेदवारांसाठी ठाकरे ब्रॅन्ड ही धोक्याची घंटा आहे. भाजपशिवाय शिंदे आणि शिंदेंशिवाय भाजप हा फरक या महापालिका निवडणूकीत स्पष्ट दिसून आला. त्यामुळे शिंदेंशिवाय भाजपचे काही अडत नसल्याचे दिसून आले. भाजप शिंदेंना महापालिकेत सत्तेचा वाटा देताना काय भूमिका घेते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे, दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी मुंबईत आपली ताकद असल्याचे लोकसभा ,विधानसभा आणि आता महापालिका निवडणूकीत दाखवून दिले. मुंबईतील 6 खासदारांपैकी 3 खासदार शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी निवडून आले त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत वायकर यांच्या पत्नीचा तर महापालिका निवडणूकीत त्यांच्या मुलीचा पराभव झाला. त्यामुळे वायकर यांच्यासाठी पुन्हा खासदार होणे अवघड आहे, फडणवीसांना उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद माहीत आहे.

Advertisement

भविष्यात कधी केंद्रात आपली ताकद दाखवावी लागली तर फडणवीसांना ठाकरे यांच्या 9 खासदारांची साथ हवी, फडणवीस हे धोरणी आणि दूरदृष्टी असलेले नेते असल्याने त्यांनी मनात आणले तर काहीही होऊ शकते, त्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी देवाच्या मनात असले तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.