केशवराव भोसले नाट्यगृह मुदतीत उभारणार का ?
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
लाखो कलाकारांचे व्यासपीठ असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह 8 ऑगस्ट 2024ला लागलेल्या आगीत कलाप्रेमी व कोल्हापुरवासियांच्या डोळ्यादेखत बेचिराख झाले. यांनतर नाट्यागृह पुन्हा जसेच्या तसे उभे करण्यासाठी राज्य शासनाने 25 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. व एका वर्षात नाट्यागृह उभा करण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेची कार्यवाही सुरू झाली. एकूण चार टप्प्यामध्ये कामाची विभागणी करण्यात आली. सध्या, यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असुन 70 टक्क्याहुन अधिक काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 3 कोटी 22 लाख रुपये खर्चाचे टेंडर प्रक्रीया पूर्ण झाली आहे.
कोल्हापूरसह राज्यातील कलाकारांचा आत्मा असणारा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह एका रात्रीत आगीत भस्मसात झाले. कोल्हापुरचा सांस्कृतिक ठेवा असणारा कलामंच डोळ्यासमोर आगीच्या भस्मस्थानी पडत असताना समस्थ कलाकारांसह कोल्हापूरकरांना अश्रू अनावर झाले होते. अचानक लागेल्या आगीमुळे होत्याचे नव्हते झाले. तत्काळ सर्वच लोकप्रतिधींसह, सामाजिक संस्था, कलामंच संस्था, विविध कलाकारांच्या संघटनांनी नाट्यागृह जसेच्यातसे उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नाट्यागृह उभे करण्यासाठी राज्य शासनाच्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून सध्या कामही सुरू आहे. नवी मुंबईची स्ट्रक्टवेल कंपनी सल्लागार म्हणून काम पाहत आहे. पहिला टप्पा पूर्णत्वास येत असुन दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास मनपा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. तीन कोटी 22 लाख रुपये खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील कामेही गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पहिल्या टप्प्यातील कामासाठी 7 कोटी 65 लाख रूपयांचे टेंडर मंजूर होऊन याचे काम पूर्णत्वास आले आहे. दुसऱ्या टप्प्याचेही काम लवकरच सुरू होणार असुन काम गतीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील कामेही गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असुन येत्या 9 ऑगस्टपर्यंत केशवराव भोसले नाट्यागृह पुन्हा जसेच्या तसे उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.
- तिसऱ्या टप्प्यातील कामाच्या निविदा प्रक्रियेची तयारी
दुसऱ्या टप्यातील कामासाठी 9 निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्याची तांत्रिक छाननी सुरु असून छाननी पुर्ण झाल्यांनतर पात्र ठेकेदारांची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या टप्याच्या कामासाठीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
- शाहूकालिन ऐतिहासिक ठेवा
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह वास्तूची बांधणी स्वत: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानेच 1915 साली उभा झाले. या वास्तूमध्ये नाट्या कला रुजली. अनेक कलाकरांनी व्यासपीठ गाजवले. नाट्यागृह आगीच्या खाईत लोटताना पाहण्याचे दुर्भाग्य कलाकारांच्या नशिबी आले. याच्या पुन:उभारणीसाठी 25 कोटींचा निधीतून काम सुरू असले तरी नाट्यागृह जसेच्या तसे उभे करून शाहूकालिन ऐतिहासिक ठेवा जपण्यासह दिलेल्या एका वर्षाच्या मुदतीत नाट्यागृह उभे राहणे गरजेचे आहे.
- असे आहेत कामाचे टप्पे :
पहिला टप्पा : जळालेली भिंत उतरवणे, दगडी भिंती काही अंतरापर्यंत उतरवून पुन्हा बांधणे व इमारतीचे संवर्धन, भिंत बांधणी, गिलावा, रूपकाम आदी कामांचा समावेश आहे. यातील भिंती बांधून गिलावा झाला असुन उर्वरीत रूपकामासह 70 टक्के काम पूर्ण आहे. सदर काम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
दुसरा टप्पा : पहिल्या व तळमजल्यावर ग्रीन रूम उभारणे. रूफकामामध्ये इमारतीच्या बाजूच्या पॅसेजमध्ये रूफिंग करणे, खासबाग मैदानाकडील स्टेज तयार करणे, फरशी फिटींग आदी कामांचा समावेश आहे. याची निविदा प्रकीया निघाली असुन काम अद्याप सुरू झालेले नाही.
तिसरा टप्पा : बाल्कणी व स्टेजसमोरील खुर्च्या बसविणे, कोचिंग करणे, साऊंड सिस्टम फिट करणे, एसी बसवणे, इलेक्ट्रीकची सर्व कामे पूर्ण करणे आदी कामाचा समोश आहे.
चौथा टप्पा : नाट्यागृबाहेरील भौतिक सुविधांची कामे. यामध्ये पार्कींग, तिकीट रूम, स्वच्छतागृह, सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे.
- पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास : ऑगस्टपर्यंत नाट्यागृह उभरण्यासाठी प्रयत्न
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामेही गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. येत्या 9 ऑगस्टपर्यंत नाट्यागृहाचे चारही टप्प्यातील कामे पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देवून कामही प्रगतीपथावर सुरू आहे.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापलिका