कोट्यावधींच्या फसवणूक प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविणार?
19 कोटीहून अधिकची फसवणूक; कुटुंबाविरुद्ध एफआयआर
बेळगाव : कर्जाच्या आमिषाने तब्बल 19 कोटी 35 लाख 35 हजार 636 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघा जणांविरुद्ध येथील माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नियमानुसार हे प्रकरण पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शेखा कन्नाप्पा हंचिनमनी, रा. सोनट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यमनापूर येथील अश्विनी होळ्याप्पा दड्डी, तिचा पती होळ्याप्पा, मुली शेवंता व प्रियांका या चौघा जणांविरुद्ध भादंवि 406, 420 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या चौघा जणांनी 7 हजार 707 जणांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
गृह खात्याच्या नियमानुसार 50 लाखापर्यंतच्या फसवणूक प्रकरणांची चौकशी पोलीस स्थानकातच करण्यात येते. 50 लाख ते 5 कोटीपर्यंतची प्रकरणे सीईएन विभागाकडे सोपविण्यात येतात. 5 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्यास ही प्रकरणे सीआयडीकडे सोपविण्यात येतात. त्यामुळे हे प्रकरणही सीआयडीकडे सोपविण्याची तयारी सुरू झाली आहे. वेगवेगळ्या फायनान्समधून कर्ज काढून देण्याबरोबरच त्याला सबसिडी देऊन हफ्तेही आम्हीच भरू, असे सांगत या चौघा जणांनी 7 हजार 707 हून अधिक जणांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही असाच प्रकार उघडकीस आला होता. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ही प्रकरणे गांभीर्याने घेतली असून सर्वसामान्य नागरिकांना कर्जाच्या खाईत ढकलणाऱ्यांची कसून चौकशी करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.