शाळा-विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षकावरील अन्याय दूर होणार?
निडगुंदी सरकारी शाळा प्रकरणी बालहक्क आयोगाचे समन्स
प्रतिनिधी/ बेळगाव
निडगुंदी (ता. रायबाग) येथील सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्य शिक्षक वीरण्णा मडिवाळर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आपल्या शाळेची सुधारणा व्हावी, विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी धरणे धरले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. राज्य बालहक्क आयोगाने या प्रकरणी स्वत:हून दखल घेतली असून बुधवार दि. 11 जून रोजी डीडीपीआय व बीईओंना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
यासंबंधी बालहक्क आयोगाने समन्स जारी केले असून त्यामुळे शिक्षण खात्यात खळबळ माजली आहे. आपण काम करीत असलेल्या प्राथमिक शाळेत जादा खोल्या बांधून द्याव्यात, या मागणीसाठी वीरण्णा मडिवाळर यांनी मौन राहून धरणे धरले होते. त्यामुळे शिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
निडगुंदी येथील सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या शिक्षकांनी आंदोलन हाती घेतले होते. गेल्या नऊ वर्षांपासून हे शिक्षक शाळेच्या विकासासाठी झटत आहेत. तरीही शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बालहक्क आयोगाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
जादा खोल्यांची मागणी करणे किंवा त्यासाठी उपोषण करणे, मौन राहून निदर्शने करणे चुकीचे नाही. त्यांच्यावर कोणत्या कारणासाठी कारवाई केली, याची माहिती आयोगाने डीडीपीआय व बीईओ यांच्याकडून मागितली आहे. 11 जून रोजी होणाऱ्या चौकशीनंतर या प्रकरणाला वळण मिळण्याची शक्यता आहे.