For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस दलाची बिघडलेली घडी पुन्हा बसेल?

11:42 AM May 30, 2025 IST | Radhika Patil
पोलीस दलाची बिघडलेली घडी पुन्हा बसेल
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि त्यांनतर शैलश बलकवडे यांनी जिह्यातून मटका आणि अवैध व्यवसाय अक्षरश: हद्दपार केला. मात्र गेल्या दोन वर्षात जिह्यात मटका, जुगार, काळेधंदेवाल्यांची मागील दाराने कधी ‘एंट्री’ झाली, ते कळलेच नाही. देशमुख आणि बलकवडे यांच्या पायवाटेनं की परंपरागत मळलेल्या वाटेवरुन पोलीस दलाची वाटचाल असणार, हे लवकरच स्पष्ट होईल. प्रचंड दबावाखाली असलेल्या पोलीस दलास विश्वासात घेऊन जिह्याची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्याचे आव्हान नवे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यापुढे आहे.

कोल्हापुरातून चालवल्या जाणाऱ्या मटक्याची महिन्याची उलाढाल सुमारे 80 ते 100 कोटींची आहे. त्यावरुन या काळ्dया धंद्याची ताकद समजते. मटका बंद होणे म्हणजे यंत्रणेचे मोठे आर्थिक नुकसान, असे मानले जाते, मटका बंद होऊच नये, यासाठी यंत्रणाच काम करत असल्याचा जुना अनुभव आहे. ऑगस्ट 2018 ते 2020 पर्यंत तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि सप्टेंबर 2020 ते मे 2023 पर्यंत शैलेश बलकवडे यांनी जिह्यातून ‘मटका बंद म्हणजे बंदच’ हे ब्रीद यशस्वी करुन दाखवल्याचे कोल्हापूरकरांच्या कायम लक्षात राहील.

Advertisement

देशमुख यांनी मटकासम्राटांना अंडरग्राऊंंड होण्यास भाग पाडले. ‘मोक्का’ लावत कायद्याचा धाक कायम ठेवला. हाच पायंडा पुढे शैलेश बलकवडे यांच्या काळातही सुरू राहिला. कोल्हापूरच्या इतिहासात 30 वर्षापूर्वी शिवप्रतापसिंह यादव यांच्या काळात आणि त्यानंतर डॉ. मनोजकुमार शर्मा, डॉ. अभिनव देशमुख आणि शैलेश बलकवडे यांच्या कारकिर्दीत असा फक्त चारच वेळा मटका खरोखरच हद्दपार झाला. ‘जसा राजा तशी प्रजा’ या न्यायाने पोलीस दल वागत असल्याचा हा दाखला आहे.

पोलीस अधिक्षकांनी पोलीस दलास वेगळ्dया उंचीवर नेले. आपली वर्दी, कर्तव्य, आपला अधिकार आणि सामाजिक सुरक्षेप्रती पोलीस अधिकाऱ्यांनी कसे असावे, हे या अधिकाऱ्यांनी कामातून दाखवून दिले. प्रामाणिक अधिकारी शांतपणे काय करु शकतो, याचा वस्तूपाठ म्हणून डॉ. शर्मा, डॉ. देशमुख आणि शैलेश बलकवडे यांच्या कारकिर्दीकडे पहावे लागेल. मावळते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कार्यालयात कमालीची शिस्त आणली. पोलीस ठाण्यात आलेल्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असा त्यांचा दंडक होता.

मटका व्यवसाय आणि गांजा विक्रीकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे मान्य करावेच लागेल. गल्लोगल्लीच्या टपऱ्यांवर मटका सुरू बिनदिक्कत सुरू आहे. गांजाचा धूर सगळ्या कोल्हापूरकरांना दिसतो, मात्र पोलिसांना दिसत नाही. फाळकुटदादा आणि चिरकुटांची मिजास वाढलेली आहे. मटका आणि गांजासह इतर अवैध व्यवसाय हे पोलीस दलाचे खिसे गरम करणारे उद्योग आहेत. त्यामुळे आताच्या महागाईत नुसत्या पगारावर भागवणे शक्य नाही, असे म्हणत यंत्रणाही पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा अनुभव आहे. फोफावलेला अवैध व्यवसाय सुरूच राहणार की पुन्हा हद्दपार होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

  • कोल्हापूरकरांचा असतो वॉच

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त पदावरील व्यक्ती कशी आहे. त्यांची काम करण्याची पद्धती कशी आहे, तो निडर आहे की चापलुसी करणारा, भ्रष्टाचारमुक्त कारभार की भ्रष्ट प्रवृत्तीला पाठबळ देणारा? याचा सगळा लेखाजोखा कोल्हापूरकर ठेवत असतात. कदाचित दुसऱ्या शहरात याकडे दुर्लक्ष असते. मात्र कोल्हापूरकरांचे अधिकाऱ्यांच्या कामाप्रति निष्ठेवर लक्ष असते. अरे खूप चांगला प्रामाणिक अधिकारी आहे रे, नाही रे भरपूर हाणतंय ते, असे बिरुद लावायला कोल्हापूरकर मागे-पुढे पहात नाहीत. आई अंबाबाईच्या गावातील प्रामाणिक सेवा ही अधिकाऱ्यांना वेगळ्या उंचीवर तर नेते किंवा कारकिर्दीत कायमचा डाग लावणारी ठरते. कोणत्या पंगतीत आपण बसायचे, हे येथे येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यानेच ठरवायचे आहे.

  • अपेक्षांचे ओझे पेलावे लागेल

वाहतुकीच्या कोंडीपासून पोलीस ठाण्यातील विलंबाबाबत कसल्याही वैयक्तिक आणि सामाजिक तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जाते, हा विश्वास कोल्हापूरकरांत निर्माण करावा लागेल. कोल्हापूरकरांना आश्वासक वाटणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी खूप छोटी आहे. या यादीत कायमचे नाव जोडण्याचे भाग्य खूप कमी लोकांना लाभले. नवीन अधिक्षकांकडून पोलीस दलाबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोल्हापूरकरांचे अपेक्षांचे ओझे त्यांना पेलावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.