बुडीत मृत्यूकडे केवळ अपघात म्हणून पाहणार?
सत्तरी तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात असलेल्या तोणीर-काजरेद्या धबधब्यावर पदभ्रमणासाठी गेलेल्या वास्को येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बुडून झालेला मृत्यू हा निव्वळ अपघात म्हणता येणार नाही. त्यात सरकारी यंत्रणा आणि शाळाही तेवढीच जबाबदार ठरते. निर्बंध असलेल्या ठिकाणी चाळीस विद्यार्थ्यांना पदभ्रमणासाठी घेऊन जाणे व त्यासाठी वनखात्याकडून नियमांचे उल्लंघन करून परवानगी देणे, अक्षम्य निष्काळजीपणाचा हा बळी आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ता अपघातात जेवढे मृत्यू झाले, तेवढीच नदी, धबधबे आणि समुद्रात बुडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजवर बुडून मरण पावणाऱ्यांमध्ये बहुतेकजण विद्यार्थी, युवा आणि उच्च शिक्षितही आहेत, हे दुर्लक्षित करता येणार नाही. या वाढत्या दुर्घटनांकडे पाहिल्यास संत तुकाराम महाराजांच्या ‘बुडती हे जन न देखवे डोळा’ या अभंग-ओवी संवेदनशिल मनांना निश्चितच जाणवत असतील. सत्तरीतून वाहणारी म्हादई व धारबांदोडा तालुक्यातून मांडवीला मिळणारी दूधसागर नदी या राज्याच्या जीवनदायीनी आहेत पण सहली, पर्यटन व पावसाळ्यातील निसर्ग भ्रमणाच्या नावाखाली बुडीत मृत्यूचा दोषही त्यांना आपल्या पोटात घ्यावा लागतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कुळे येथे दूधसागर नदीच्या डोहात वास्कोच्याच तिघा सख्ख्या भावांसह चौघांचा व त्यानंतर आठवड्याभरात कुळे येथे राहणाऱ्या दोघा चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला. वाहत्या नदीच्या प्रवाहांमध्ये बऱ्याच ठिकाणी धोकादायक स्पॉट तयार झाले आहेत. ट्युशनला जातो, असे आई-वडिलांना खोटे सांगून पोहायला जाणारी कोवळ्या वयातील मुले, परीक्षा संपल्याचा आनंद साजरा करण्यासाठी नदीत उतरणाऱ्या ‘आयआयटी’च्या उच्च शिक्षितांपासून अनेक विद्यार्थी व युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आई-वडिलांचा एकुलता मुलगा गेल्याने कुटुंबांचे चिराग विझले आहेत. तरीही अशा घटना सातत्याने घडताना दिसतात. एका सत्तरी तालुक्यातच गेल्या दहा वर्षांत पन्नासहून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाल्याचे, आकडेवारी सांगते.
सत्तरीतील ज्या धबधब्यावर हा विद्यार्थी बुडाला, ती जागा म्हादई वन्यजीव या आरक्षित अभयारण्यात येते. या वन्यक्षेत्रात पदभ्रमण किंवा सहलींसारख्या गोष्टींना कायदेशीररित्या पूर्णपणे निर्बंध आहेत. त्याचे उल्लंघन झाल्याने घटनेच्यावेळी ड्युटीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय बेजबाबदार शिक्षकांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेचा संपूर्ण अहवाल वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागितला आहे.
पावसाळ्यात राखीव वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धबधब्यांकडे, सहली पर्यटनावर जुलै महिन्यापासून निर्बंध घातले आहेत. त्यामागे वाढत्या घटना हेच मुख्य कारण आहे. नदीचे डोह आणि धबधब्यांबरोबरच समुद्र किनाऱ्यावर बुडणाऱ्यांची संख्याही दुर्लक्षित करता येणार नाही. धारबांदोडा, सत्तरी, पेडणेसारख्या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात चिरेखाणीमध्ये भरून राहणाऱ्या पाण्यांमध्येही विद्यार्थी बुडाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. अशा दुर्घटना रोखण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून धोकादायक चिरेखाणींवर निर्बंध व सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वेही लागू केली आहेत पण त्याचे पालन होताना दिसत नाही.
जगभरात बुडून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 25 जुलै हा ‘जागतिक बुडीत मृत्यू प्रतिबंधक दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. ‘गोवा कॅन’ ही बिगर सरकारी संस्था गेल्या तीन वर्षांपासून गोव्यात या मुद्यावर जागृती उपक्रम राबविते. काही नद्यांवरील धोकादायक स्थळेही त्यांच्या पुढाकाराने अधोरेखित करण्यात आली आहेत मात्र त्याचा तेवढा प्रभाव व पाठपुरावा संबंधित यंत्रणांकडून होताना दिसत नाही. रस्ता अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे शाळा, महाविद्यालयात ‘रोड सेफ्टी’ कार्यक्रम राबविले जातात तसेच जागृती कार्यक्रम या विषयावरही होणे गरजेचे आहेत.
माणसाला नदी व पाण्याचे आकर्षण ही आंतरिक उर्मी निसर्गदत्त असली तरी दोन्ही घटकांना आपापल्या मर्यादा आहेत. या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा अशा दुर्घटना घडतात. गोव्यातील नद्या, धबधबे व सुमद्रात बुडण्याच्या घटना नेमके हेच अधोरेखित करते. पाणी हे जीवन असले तरी ते मृत्यूला कारणीभूत ठरते तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित होतात. आता तर हा सामाजिक चिंतेचा विषय बनला आहे. सहलीसाठी येणारे तरुण जेव्हा पाण्यात उतरतात, तेव्हा नदीच्या प्रवाहातील प्रचंड चुंबकीय शक्तीचा अंदाज येत नसल्याने माणूस त्यात खेचला जातो. शास्त्रीय भाषेत त्याला ‘अंडर करंट’ असे म्हटले जाते. शहरी पर्यटक त्याबद्दल नेहमीच अनभिज्ञ असतात. बेधुंद अवस्थेत जेव्हा ते पाण्याच्या प्रवाहात उतरतात, तेव्हा बेसावध क्षणी जीव गमावून बसतात. या सर्व सतर्कतेच्या व सुरक्षेच्या गोष्टींची विविध माध्यमातून प्रभावी जागृती, सरकारी यंत्रणांकडून निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास अशा घटना नियंत्रणात येऊ शकतात.
सदानंद सतरकर