इराणशी चर्चा करणार : जेडी वेन्स
इराणचा आण्विक कार्यक्रम अमेरिकन बंकर बस्टर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे नष्ट झाल्याची घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. परंतु प्रत्यक्षातील स्थिती याहून अधिक अस्पष्ट असल्याचे समोर आले आहे. इराणच्या बॉम्ब-ग्रेड यूरेनियम साठ्याचे काय झाले याची माहिती नसल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. इराणच्या या इंधनाबद्दल (10 अण्वस्त्र तयार करता येईल इतके इनरिच्ड यूरेनियम) नेमकं काय करावे याचा निर्णय आगामी काळात घेणार आहोत आणि याविषयी इराणशी चर्चा करणार असल्याचे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी सांगितले आहे.
यूरेनियमद्वारे अण्वस्त्र तयार करण्याची इराणची क्षमता बऱ्याचअंशी प्रभावित झाली आहे, कारण आता या इंधनाला अण्वस्त्रात बदलण्यासाठी इराणकडे उपकरणे नाहीत असा युक्तिवाद जेन्स यांनी केला आहे. तर इराणने याप्रकरणी अमेरिकेशी चर्चा करण्यात कुठलीच रुची नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. याचबरोबर यूरेनियमचा हा साठा आता इराणसाठी आण्विक ब्लॅकमेलिंगचे साधन ठरणार आहे.
इराणने काही दिवसांपूर्वी संबंधित आण्विक केंद्रांवरून उपकरणे आणि 60 टक्के इनरिच्ड असलेले 400 किलोग्रॅम यूरेनियम हटविले होते याचे पुरावे उपलब्ध आहेत असे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इराणने आण्विक सामग्री संरक्षित केल्याचे आता रहस्य नसल्याचे वक्तव्य आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रासी यांनी केले आहे.