आरोग्य, पर्यटनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पाचा लाभ घेणार
आरोग्यमंत्री राणे : भाजपकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सामान्य जनतेला मध्यभागी ठेवताना त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन या खात्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचा गोव्याला लाभ मिळवून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. भाजपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
मंत्री राणे यांनी सांगितले की, केंद्राने आरोग्यक्षेत्रात विविध तरतुदी लागू करताना आरोग्य शिक्षणासाठीही मदत व्हावी या दृष्टीकोनातून जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोवा राज्यासाठी जे जे फायदे घेता येतील, ते आम्ही निश्चितच घेण्याचा प्रयत्न करू. ऊग्णांना दिलासा देण्याच्या दृष्टीने कर्करोगासारखे उपचार घेताना यावर मोठ्या प्रमाणात सामान्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान व निर्मला सीतारमण यांनी लक्ष्य दिल्याचे राणे म्हणाले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अर्थ संकल्पामध्ये पर्यटन आणि आयटीसाठी करण्यात आलेल्या तरतूदी सांगत गोव्यातील पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्प कसा फायदेशीर ठरणार याविषयी माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, आयकरमधील सवलत असो किंवा आरोग्य, पर्यटनक्षेत्र आणि मच्छीमारांसाठी केंद्रीय अर्थ संकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. गोव्यातील सर्व घटकांना त्याचा फायदा होणार असल्याने भाजपातर्फे आम्ही अर्थ संकल्पाचे स्वागत करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.