For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुथरा बंधूंवर कठोर कारवाई होईल का ?

06:30 AM Dec 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
लुथरा बंधूंवर कठोर कारवाई होईल का
Advertisement

गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. साहजिकच पर्यटक म्हटले की, पर्यकांच्या सुख-सोयींबरोबरच मनोरंजनाच्या गोष्टी कराव्या लागतात. त्यात गोव्याच्या समृद्ध कलांचे दर्शन घडविणे शक्य आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नाईट क्लब संस्कृती बहरू लागली आहे. अशाच नाईट क्लब संस्कृतीमुळे हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये 25 जणांचा बळी गेला. याप्रकरणी पोलिसांनी गौरव व सौरभ लुथरा या बंधूंना अटक केली आहे.

Advertisement

25 जणांचा नाहक बळी गेल्याने संपूर्ण गोवा हादरला. या क्लबचे मालक असलेल्या लुथरा बंधूना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पण, या बंधूवर कठोर कारवाई होणार का? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 6 डिसेंबर रोजी झालेल्या अग्नितांडवात हडफडे येथे 25 जणांचा बळी जात असताना, लुथरा बंधू त्याच रात्री दिल्लीतून थायलँडला पोचले. नाईट क्लबला आग लागून अनेकांचा बळी गेला असल्याची कल्पना येथील लोकप्रतिनिधीनी अथवा त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी त्यांना दिली असावी व त्यानी त्वरित देश सोडण्याचा निर्णय घेतला. नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना घडूनदेखील लुथरा बंधूनी गोव्यात येण्याचे सौजन्य दाखवले नाही. उलट त्यांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. यावरून ते दोषी असल्याचे स्पष्ट झाले.

‘बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब’च्या मूळ जागेवरूनच वाद आहे. या जागेच्या मालकांनी न्यायालयात धाव घेऊन जागा परत ताब्यात मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, लुथरा बंधूनी त्यांना दाद दिली नव्हती. या नाईट क्लबला मिळालेले परवानेसुद्धा संशयाच्या घेऱ्यात आहे. त्यामुळे सरकारने त्वरित तीन सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. स्थानिक सरपंचही आता अडचणीत सापडला आहे.

Advertisement

विधानसभेतील प्रश्नाकडे दुर्लक्ष भोवले

या नाईट क्लब संदर्भात भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता व हा नाईट क्लब बेकायदेशीर असल्याचे सांगून काही कागदपत्रे आपल्याजवळ असल्याचा दावा केला होता. मात्र, या गंभीर विषयाकडे विधानसभेतही दुर्लक्ष करण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांने आपण या प्रकरणाची चौकशी करतो, असे आश्वासनसुद्धा विधानसभेत सत्ताधारी आमदाराला मिळाले नाही.

विधानसभेत या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले नसते आणि या नाईट क्लबची सखोल चौकशी झाली असती तर कदाचित 6 डिसेंबरच्या रात्री घडलेली घटना टळली असती व 25 जणांचे जीव वाचले असते. पण, विधानसभेत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण काय असावे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. लुथरा बंधूंनी संपूर्ण सरकारी यंत्रणा खरेदी केली होती का ? म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले की, विधानसभेतील कामकाज गांभीर्याने घेतले जात नाही. हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

लुथरा बंधूंना आता अटक झालीय. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असे सर्वांचेच मत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायची असेल तर पोलिसांना भक्कम पुरावे गोळा करावे लागतील. तसेच तपासकामात कोणतीच त्रुटी ठेवता येणार नाही. जर तपासकामात त्रुटी राहिल्या तर न्यायालयातून त्यांची सुटका होण्याची शक्यताही नाकारली जात नाही. तपास यंत्रणेवर कोणताच राजकीय दबाव असता कामा नये तरच पोलीस या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करू शकतील.

लुथरा बंधूंवर कठोर कारवाई करून भविष्यात कुणीही निष्काळजीपणा करणार नाही तसेच सर्व परवाने कायदेशीर मार्गानेच मिळविणार असा संदेश सर्वांपर्यंत गेला पाहिजे. त्यातच सरकारचे व पर्यटनक्षेत्राचे हित आहे. पैशाच्या बळावर सरकारी यंत्रणा खरेदी केल्या जाऊ शकत नाही, असा संदेशही त्यातून गेला पाहिजे.

25 जणांचा बळी एकाच वेळी गेल्याने सरकारने तसेच न्यायालयाने कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. राज्यात नाईट क्लब सारखी बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास किंवा त्यांना टाळे ठोकण्यास सुरवात केली आहे. सर्व आस्थापनांसाठी सुरक्षा ऑडिट अनिवार्य करणे, परवाना उल्लंघनांवर (जसे की ना-हरकत प्रमाणपत्रांचा अभाव) कठोर कारवाई करणे आणि भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी हॉटेल्स / क्लबमध्ये अग्निसुरक्षा तपासणी वाढवणे, तसेच न्यायालये नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिलेला आहे.

आगीची चौकशी करण्यासाठी, जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. सरकारी अधिकारी परवान्यांची पडताळणी करत आहेत, अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्रांचा अभाव आणि नियमांचे उल्लंघन नोंदवत आहेत.

न्यायालयाने स्वत:हून (सुओ मोटो) दखल घेऊन सरकारला कठोर अग्निसुरक्षा नियम, तपासणी कार्यपद्धती आणि आपत्कालीन योजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. सर्व आस्थापनांनी सात दिवसांच्या आत अंतर्गत सुरक्षा ऑडिट करणे आणि तपासणीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आस्थापन बंद करणे, परवाना निलंबित करणे किंवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत खटला चालविण्याचा इशारा दिला आहे.

अग्निशामक दलाने नाईट क्लब, बार आणि हॉटेल्सची तपासणी तीव्र केली आहे. मनोरंजन स्थळांमध्ये योग्य बाहेर पडण्याचे मार्ग, गर्दी नियंत्रण आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे. तसे पाहता या गोष्टी अगोदर व्हायला पाहिजे होत्या. मात्र, 25 जणांचा बळी गेल्यानंतरच या गोष्टी घडत आहेत. निदान भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठीच या उपाययोजना महत्वाचा देखील आहेत.

Advertisement
Tags :

.