भारतासोबत संबंध मजबूत करू : तालिबान संरक्षणमंत्री
दोहा :
भारत आणि अफगाणिस्ताच्या मैत्रीने बिथरलेल्या पाकिस्तानला तालिबानचे संरक्षणमंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद उर्फ मुल्ला याकूब यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तान-तालिबान यांच्यातील तणावात भारताची कुठलीच भूमिका नव्हती. आम्ही भारतासोबत केवळ संबंध कायम राखणार नसून ते मजबूतही करणार आहोत, असे वक्तव्य मुल्ला याकूब यांनी केले आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट पाकिस्तानात हिंसा करणाऱ्या गटांना बळ पुरवत असल्याचा आरोप पाकिस्तान करत आहे. अफगाण तालिबान भारताच्या सूचनेनुसार हा प्रकार करत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तर तालिबानने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळले आहेत. आमचे धोरण कधीच स्वत:च्या क्षेत्राचा वापर इतर देशांच्या विरोधात करण्याचे राहिलेले नाही. आम्ही भारतासोबत एक स्वतंत्र राष्ट्राच्या स्वरुपात संबंध बाळगणार असून स्वत:च्या राष्ट्रीय हितांच्या कक्षेत या संबंधांना मजबूत करू. आमचा उद्देश संबंध वृद्धींगत करणे आहे, तणाव निर्माण करणे नसल्याचे मुल्ला याकूब यांनी स्पष्ट केले. युद्धविराम करारातील प्रत्येक तरतुदीबाबत दोन्ही देशांनी प्रतिबद्ध रहायला हवे. करारातील अटींबद्दल अफगाणिस्तान प्रतिबद्ध आहे, परंतु पाकिस्तानने जबाबदारी पूर्ण न केल्यास समस्या निर्माण होणार आहे. एखादा देश अफगाणिस्तानवर हल्ला करत असेल तर आम्ही आमच्या भूमीचे शौर्याने रक्षण करणार आहोत. स्वत:च्या मातृभूमीचे रक्षण करण्याचा अफगाणींचा मोठा इतिहास राहिला असल्याचे याकूब यांनी सांगितले आहे.