For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजीव सान्याल होणार प.बंगालचे अर्थमंत्री?

02:01 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
संजीव सान्याल होणार प बंगालचे अर्थमंत्री
Advertisement

पंतप्रधान मोदींचे सल्लागार : नंदिग्राम मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर आता राज्याच्या पुढील अर्थमंत्र्यांसंबंधी जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आणि प्रख्यात अर्थतज्ञ संजीव सान्याल हे बंगालच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळू शकतात. भाजप सध्या त्यांच्या नावावर विचार करत आहे. संजीव सान्याल यांना भाजपकडून नंदिग्राम पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदिग्राम या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. अधिकारी यांनी आता भवानीपूर मतदारसंघ कायम ठेवत नंदिग्रामचे प्रतिनिधित्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशास्थितीत आता नंदिग्राम पोटनिवडणुकीसाठी सान्याल यांना भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अधिकारींकडे सध्या अर्थ मंत्रालय

बंगालमध्ये अधिकारी यांच्यासोबत 5 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अर्थ मंत्रालय मुख्यमंत्री अधिकारी यांच्याकडेच आहे. तसेच गृह, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि वाणिज्य विभागाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. संजीव सान्याल हे अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यात दिसून आले होते. सान्याल यांच्या पत्नी स्मिता बरुआ यांनी महिला मतदारांपर्यंत भाजपची पोहोच मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावली होती.

मिळू शकते मोठी जबाबदारी

भाजप यापूर्वी देखील अनुभवी अधिकारी आणि विषयतज्ञांना राजकारणात मोठी जबाबदारी सोपवित राहिला आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी याची मोठी उदाहरणे आहेत. आता संजीव सान्याल हे राजकारणात प्रवेश करू शकतात. बंगालची आर्थिक स्थिती सुधारण्याविषयी सान्याल हे सातत्याने मतप्रदर्शन करत आहेत. सान्याल यांचा जन्म कोलकात्यातच झाला होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर सान्याल हे ऑक्सफोर्डमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. 2017 मध्ये सान्याल केंद्र सरकारशी जोडले गेले असून सध्या पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत.

Advertisement

.