भ्रष्ट सरकारला हटवणारच!
म्हैसूर चलो’ पदयात्रेच्या समारोपप्रसंगी भाजप-निजद नेत्यांची घोषणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटपप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप व निजदने आयोजिलेल्या पदयात्रेचा शनिवारी म्हैसूरमध्ये समारोप झाला. ‘म्हैसूर चलो’ पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेत भाजप-निजद नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच राज्य सरकारविरोधात संघर्षाचे बिगुल वाजवत भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय लढा थांबणार नसल्याचे घोषणा केली.
भाजप-निजदच्या पदयात्रेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने शुक्रवारी म्हैसूरमधील महाराजा कॉलेज मैदानावर जनआंदोलन सभा घेतली. याच मैदानावर शनिवारी युतीने पदयात्रेचा समारोप केला. मुडाच्या बेकायदा भूखंड वाटप प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. तोपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर वर्षभरातच भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. जनहिताचा सरकारला विसर पडला आहे. मुडा गैरव्यवहारात सिद्धरामय्याच सामील आहेत. जर या प्रकरणात सिद्धरामय्या सामील नसतील तर सीबीआय तपासाला घाबरण्याचे कारण काय?, असा सवाल करत भाजप-निजद नेत्यांनी आधी सिद्धरामय्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी येथील सभेत केली.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर सडकून टीका केली.
तुम्हाला घरी पाठवेपर्यंत गप्प बसणार नाही : येडियुराप्पा
मी आता 82 वर्षांचा आहे. अजूनही हात-पाय घट्ट आहेत. राज्यभरात संचार करून तुम्हाला घरी पाठवेपर्यंत गप्प बसणार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. मी राजकीय निवृत्ती घ्यावी, असे सिद्धरामय्या सांगत आहेत. मात्र, मी शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण करेन. हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला समोरे जा, असे आव्हानही त्यांनी दिले. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे लूट करण्यास निघाले आहेत. या नेत्यांच्या पापाचा घडा भरला आहे. या क्षणी निवडणूक झाल्यास भाजप-निजद युतीला 130 जागा मिळतील. जिभेवर नियंत्रण ठेवून पंतप्रधान मोदी, माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याविषयी भाष्य करा, असा टोलाही येडियुराप्पांनी लगावला.
सिद्धार्थ यांच्या आत्महत्येचे रहस्य उघड करा : कुमारस्वामी
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व कॅफे कॉफी डे चे सिद्धार्थ यांच्या आत्महत्येमागील रहस्य जनतेला सांगा, असे आव्हान केंद्रीयमंत्री कुमारस्वामी यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिले. तुमच्या पापाचा घडा भरला आहे. त्याचे प्रायश्चित्त भोगत आहात. सिद्धरामय्या यांच्याविरुद्धच्या अर्कावती भूखंड घोटाळ्याचा अहवाल उघड करावे, अशी मागणी त्यांनी केली. माझ्यावर डोळा ठेवणाऱ्य्यांनी वेळीच सुधारावे, अन्यथा जनताच सरकारला धडा शिकवेल. भाजप-निजद तुम्हाला पायउतार करण्याचे काम करणार नाही. तुमच्याच पक्षातील नेते हे काम करतील, अशी टिकाही कुमारस्वामी यांनी केली.
जनआंदोलन नव्हे; धनआंदोलन : प्रल्हाद जोशी
तुमच्यावर सर्वत्र काळे डाग पडले आहेत, अशी टीका केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सिद्धरामय्यांवर केली. मुडा गैरव्यवहार प्रकरणात सिद्धरामय्या यांन शिक्षा झालीच पाहिजे. काँग्रेसची शुक्रवारी झालेली जनआंदोलन सभा नव्हे; धनआंदोलन सभा होती. याचे समर्थन करण्यासाठीच म्हैसूरमध्ये काँग्रेसने सभा घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्येच अंतर्गत संघर्ष आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात लुटारूंचे सरकार : राधामोहन दास
शुक्रवारी येथे सरकारी पैशांतून सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने सभा घेतली. राज्यात लुटारू सरकार आहे. डी. के. शिवकुमार यांचे भ्रष्टाचार सर्वांनाच ठाऊक आहेत. आमचा लढ्याचे रुपांतर जनआंदोलनात झाले आहे, असे राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास यांनी म्हटले आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा : आर. अशोक
काँग्रेस सरकार पायउतार न झाल्यास निष्ठावंत अधिकाऱ्यांना येथे स्थान काही. काँग्रेसविरुद्ध, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा आहे. तीन ते चार हजार कोटींच्या मुडामधील गैरव्यवहाराची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठीच हे आंदोलन आहे, असे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सांगितले.
केंद्रीय नेते अनुपस्थित
पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमात भाजपचे केंद्रीय नेते सहभागी झाले नाहीत. निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा देखील सभेला अनुपस्थित राहिले. कार्यक्रमासाठी भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी भाजपच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांचा म्हैसूर दौरा रद्द झाला. सभेला माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, कुमारस्वामी, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी, राज्य भाजप प्रभारी राधामोहन दास यांच्यासह भाजप-निजद पक्षातील आमदार, खासदार व इतर नेते उपस्थित होते.