For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी 8-9 वर्षे अध्यक्षपदी राहणार!

06:55 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आणखी 8 9 वर्षे अध्यक्षपदी राहणार
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य : अजून खूप काम करणे शिल्लक

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी 8-9 वर्षांनंतर अध्यक्षपद सोडणार आहे असे ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले, प्रारंभी हे ऐकून लोक हसू लागल्यावर ट्रम्प यांनी मी चेष्टा करत नसून मला काम करणे पसंत असल्याचे नमूद केले. सध्या माझ्या कार्यकाळाची सुरुवातच झाली आहे आणि अजून खूप काम शिल्लक असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले.

Advertisement

ट्रम्प हे पुढील महिन्यात 80 वर्षांचे होणार आहेत. मी वृद्ध नाही, तर वृद्धापेक्षा अधिक तरुण आहे. 50 वर्षांपूर्वी जसे वाटत होते तसेच मला आजही वाटते असे  ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा तिसऱ्या कार्यकाळाचे संकेत दिले आहेत.

तिसऱ्या कार्यकाळासाठी विधेयक

यापूर्वी एंडी ओगल्स यांनी 23 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात एक विधेयक मांडले होते. अमेरिकेच्या राज्यघटनेत बदल करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मार्ग खुला करणे हा या विधेयकाचा उद्देश होता. जो व्यक्ती सलग दोनवेळा अध्यक्षपदी राहिला नाही, त्याला तिसऱ्यांदा निवडणूक लढवू देण्याची अनुमती द्यावी असे या विधेयकात म्हटले गेले होते. परंतु हे विधेयक सभागृहात मतदानापर्यंत पोहोचू शकले नव्हते.

घटनादुरुस्ती करणे अवघड

अमेरिकेत घटनादुरुस्ती करणे अत्यंत अवघड आहे. याकरता प्रतिनिधिगृह आणि वरिष्ठ सभागृह दोन्ही ठिकाणी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. वर्तमान स्थितीत रिपब्लिकन पार्टीकडे इतके बहुमत नाही. याचबरोबर अशाप्रकारचे बदल लागू करण्यासाठी 50 पैकी कमीतकमी 38 प्रांतांची मंजुरीही आवश्यक असते. सध्या अनेक प्रांतांमध्ये डेमोक्रेटिक पार्टीची सत्ता असल्याने अशाप्रकारचा प्रस्ताव संमत होणे अत्यंत अवघड मानले जाते.

73 वर्षांपूर्वी लागू झालेला नियम

अमेरिकेत पूर्वी कुठलाही व्यक्ती केवळ 2 वेळाच अध्यक्ष होण्यासंबंधी कुठलीच तरतूद नव्हती. 1951 साली राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली, याच्या अंतर्गत अमेरिकेत कुठलाही व्यक्ती केवळ 2 वेळा अध्यक्ष होऊ शकतो असा नियम करण्यात आला. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दोन कार्यकाळानंतर निवृत्ती घेतली होती. तेव्हापासून दोनहून अधिक कार्यकाळ न देण्याचा अनौपचारिक नियम झाला होता, यानंतर अमेरिकेत ही प्रथा ठरली होती. अमेरिकेच्या 31 अध्यक्षांपैकी कुठल्याही अध्यक्षाने ही प्रथा मोडली नाही, परंतु फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्या कार्यकाळात हा नियम मोडला गेला. 1933 पासून 1945 पर्यंत ते चारवेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले.

ट्रम्प घटनादुरुस्ती करू शकतात का?

-अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उतरण्यासाठी ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेत बदल करावा लागेल, जो करणे सोपे नसेल.

-अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमताने डोनाल्ड ट्रम्प यांना एक विधेयक संमत करवून घ्यावे लागणार आहे.

-अध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीकडे अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांमध्ये इतके संख्याबळ नसल्याने सद्यस्थितीत हे अशक्य वाटते.

-सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीकडे 100 पैकी 52 खासदार आहेत. तर प्रतिनिधिगृहात 435 पैकी 220 सदस्य आहेत.

-दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळाले तरीही ट्रम्प यांना घटनादुरुस्ती करवून घेणे सोपे नसणार आहे.

-अमेरिकेच्या संसदेत विधेयक संमत झाल्यावर या घटनादुरुस्तीसाठी 50 पैकी कमीतकमी 38 प्रांतांकडून मंजुरी मिळविणे बंधनकारक आहे.

Advertisement
Tags :

.