सायकल फेरीत सहभागी होऊन मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करणार
महिला आघाडीचा निर्धार
बेळगाव : मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात कडकडीत बंद पाळून काळादिन सायकल फेरी काढली जाते. फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला जातो. यावेळी सीमाभागातील अधिकाधिक महिला यामध्ये सहभागी होऊन मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करतील, असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
महिला आघाडीची महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी अध्यक्ष रेणू किल्लेकर यांनी महिलांना मार्गदर्शन करून सीमाभागावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. सीमाप्रश्नाच्या पहिल्या लढ्यापासून महिलांचा सहभाग आहे. त्यामुळे 70 वर्षांनंतरही मोठ्या संख्येने महिला या लढ्यामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या सेक्रेटरी सरिता पाटील म्हणाल्या, महिलांनी काळी साडी घालून अथवा काळी फित बांधून सायकल फेरीमध्ये सहभाग नोंदवून आपला निषेध व्यक्त करावा. उपाध्यक्ष सुधा भातकांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाग्यश्री जाधव, प्रिया कुडची, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, बसव्वा दंडू, कोमल पाटील, सविता काकतकर, माला जाधव, आशा पाटील, अरुणा शिंदे, राजश्री बांबुळकर यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.