महसूल वाढीसाठी धोरणात्मक सूचना तयार करू : मुख्यमंत्री
नवी दिल्ली जीएसटी कौन्सिल बैठकीत प्रमोद सावंत यांची घोषणा
पणजी : भारताच्या वित्तीय परिसंस्थेला बळकटी देणारी आणि ‘एक राष्ट्र, एक कर’ या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारी मजबूत आणि समतापूर्ण जीएसटी चौकट सुनिश्चित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जीएसटी परिषदेअंतर्गात राज्य-विशिष्ट धोरणात्मक सूचना तयार करू, अशी घोषणा जीएसटी परिषद कौन्सीलचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. नवी दिल्ली येथे काल शुक्रवारी झालेल्या जीएसटी महसूल विश्लेषणावरील मंत्र्यांच्या गटाच्या (जीओएम) बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. बैठकीला भारतातील बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री व प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवाहांचा आढावा घेऊन जीएसटी संकलन सुधारण्यासाठी कृतीयोग्य धोरणांवर चर्चा केली. बैठकीत घेण्यात आलेल्या प्रमुख मुद्यांमध्ये जीएसटीपूर्वीच्या आणि नंतरच्या महसुलाचे तुलनात्मक विश्लेषण, क्षेत्र-विशिष्ट गळती दूर करणे, अनुपालन अंमलबजावणी साधनांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे, चांगल्या ट्रेसेबिलिटीसाठी ई-इनव्हॉइसिंग आणि आयटी सिस्टम वाढवणे आणि महसूल वाढवण्यासाठी राज्य-विशिष्ट धोरणात्मक सूचना तयार करणे यांचा समावेश होता. बैठकीत केंद्र आणि राज्य कर प्रशासनांमधील सुधारित समन्वयाचे महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आले.