सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरीसिन विक्रेता संघटनेची बैठक शनिवारी
आगामी धरणे आंदोलनासह मोर्चा तसेच संपाचे नियोजन करणार
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरीसिन विक्रेता संघटनेची महत्वाची बैठक शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजता सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनच्या वरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबरच्या जिल्हा धरणे आंदोलनासह ११ डिसेंबरला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मोर्चा तसेच १ जानेवारीच्या संपाचे नियोजन करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
रेशन धान्य दुकानदारांच्या प्रलंबित विविध मागण्याबाबत शासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डिलर फेडरेशन अंतर्गत अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाने प्रत्येक जिल्हयात धरणे आंदोलनासह नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मोर्चा तसेच संप पुकारला आहे. या तिन्ही दिवशी धान्य व केरोसीन वितरण संपूर्ण जिल्ह्यात बंद राहणार असून पुरवठा विभागामार्फत होणारे धान्य उचल व इतर प्रशासकीय व्यवहारही व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.
या बैठकीत आयुष्यमान भारत कार्ड लॉगिनला ऑफिस कडून होणाऱ्या सक्तीला विरोध करण्याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला सावंतवाडी तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानदार व केरीसिन विक्रेत्यांनी तसेच सेल्समन, चेअरमन, बचत गट/ कमिटी अध्यक्ष यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका धान्य दुकानदार व केरीसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणपत राणे, उपाध्यक्षा सौ तन्वी परब, सचिव अमेय गावडे, खजिनदार अनिकेत रेडकर यांनी केले आहे.