टीटीपीविरोधात करणार नाही कारवाई : तालिबान
वृत्तसंस्था/ .इस्लामाबाद
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात तहरीक-ए-तालिबान म्हणजेच टीटीपीवरून तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकर यांच्या धमकीनंतर तालिबानने टीटीपी विरोधात कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. टीटीपी समस्येवर पाकिस्ताननेच पर्यायी तोडगा सुचवावा असे तालिबानने म्हटले आहे. तालिबानने टीटीपीवर कारवाई न केल्यास अफगाणिस्तानात घुसून सैन्य कारवाई करू अशी धमकी पाकिस्तान सरकारने दिली होती.
तर पाकिस्तानच्या या धमकीकडे तालिबानने दुर्लक्ष केले आहे. याचमुळे पाकिस्तानने 17 लाख अफगाण शरणार्थींना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूनही तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. तालिबानने अमेरिकेच्या विरोधात टीटीपीसोबत मिळून लढाई लढली होती. यामुळे तालिबानला टीटीपीवर कारवाई करता येत नसल्याचे मानले जात आहे. तसेच कारवाई केल्यास टीटीपीचे सदस्य इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याची भीती आहे.