मानहानीकारक टिप्पणी करणार नाही
आपचे खासदार संजय सिंग यांच्या वकिलांनी दिली न्यायालयाला हमी : सुलक्षणा सावंत यांच्या अब्रुनुकसानीच्या खटल्यावर सुनावणी सुरू
डिचोली : ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांची बदनामी केल्याप्रकरणी सुलक्षणा सावंत यांनी दिल्लीतील आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या विरोधात डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यावर सुनावणी झाली. त्यात संजय सिंह यांच्यावतीने उपस्थित झालेले वकील एस. बोडके यांनी न्यायालयात हमी देताना कोणतेही मानहानीकारक विधान पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत प्रतिवादीकडून केले जाणार नाही, असे सांगितले. दिल्लीतील आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी गोव्यात गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांची बदनामी केली होती.
त्यांच्या विरोधात सुलक्षणा सावंत यांनी डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्यावर काल शुक्रवारी सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी आता 24 जानेवारीला होणार असून पुढील सुनावणी होईपर्यंत माझ्या अशिलाकडून कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करण्यात येणार नाही, असे या खटल्यातील प्रतिवादी खासदार संजय सिंग यांचे वकील बोडके यांनी न्यायालयात स्पष्ट केल्याची माहिती सुलक्षणा सावंत यांचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी दिली. हे विधान न्यायालयाने नोंद करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीवेळी सुलक्षणा सावंत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड. सुनील मनोहर, अॅड. प्रल्हाद परांजपे, अॅड. संजय सरदेसाई, अॅड. अथर्व, अॅड. टेंबे, अॅड. ए. एस. कुंदे उपस्थित होते. तर संजय सिंग यांच्यावतीने अॅड. बोडके उपस्थित होते .