पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार यांची भेट! आता इतरत्र जाणार नाही : नितीश कुमार
: जागावाटपासंबंधी लवकरच निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. नितीश कुमार हे सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीगाठीनंतर नितीश यांनी रालोआत पुन्हा सामील होण्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही (भाजप-संजद) 1995 पासून एकत्र होतो. मधल्या काळात आम्ही इकडे-तिकडे गेलो होतो, परंतु आता मी अन्य कुठेच जाणार नसल्याचे नितीश यांनी म्हटले आहे. तर जागावाटपासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची भेट अन् चर्चा सुमारे अर्धा तास चालली. नितीश सरकारला 12 फेब्रुवारी रोजी बिहार विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी भाजपच्या नेतृत्वासोबत चर्चा केली आहे. या चर्चेत राज्यासंबंधीचे काही मुद्दे सामील होते असे संजदच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बिहारमध्ये राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होणार असून याकरता 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या 6 जागांपैकी दोन जागा सध्या संजदकडे तर दोन जागा राजदकडे आहेत. तर प्रत्येकी एक जागा भाजप आणि काँग्रेसकडे आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. नितीश कुमार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआत पुन्हा प्रवेश केला होता. तसेच राजद आणि काँग्रेससोबतची आघाडी त्यांच्या पक्षाने संपुष्टात आणली होती. भाजपच्या पाठिंब्याद्वारे त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतली होती.