ब्लॅकमेलिंगच्या डावपेचांना बळी पडणार नाही : राणे
प्रतिनिधी/ पणजी
कायदे विधानसभेत बनतात, रस्त्यावर उतरून नव्हे, त्यामुळे अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगच्या डावपेचांना आम्ही बळी पडणार नाही, असा इशारा नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी पाळे-शिरदोणवासियांना दिला आहे.
एखाद्या सरकारी कार्यालयात गेल्यानंतर लोकांनी तेथे शिष्टाचार पाळला पाहिजे, असे सांगताना राणे यांनी टीसीपी कार्यालयात आमदार विरेश बोरकर यांच्याबाबतीत नेमके काय घडले याचा शोध घेणार असल्याचे म्हटले आहे. सांताक्रूज मतदारसंघातील पाळे-शिरदोण येथील भूखंडाचे ऊपांतरण केल्याच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी टीसीपी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी बोरकर यांना बळजबरीने तेथून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत बोरकर यांचे डोके कार्यालयाच्या पायऱ्यांवर आपटल्याने ते जखमी झाले व भोवळ येऊन पडले.
हा प्रकार मंत्री राणे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी व्हिडिओ संदेश जारी करून वरीलप्रमाणे वक्तव्य केले आहे. लोकांनी सरकारी कार्यालयांमध्ये शिष्टाचार पाळला पाहिजे, तेथील अधिकाऱ्यांना गृहित किंवा वेठीस धरले जाऊ शकत नाही. त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपाय शोधले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी आंदोलकांना तेथे झोपू द्या किंवा हवे ते करू द्या, आपल्याला काहीच फरक पडत नाही, असे म्हटले आहे.