भारताच्या विरोधात काहीच करणार नाही
बांगलादेशच्या सैन्यप्रमुखांनी दिला विश्वास : ईशान्येतील सुरक्षेकरिता सहकार्य
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात मागील वर्षी मोठी राजकीय उलथापालथ घडली असून शेख हसिना यांना देश सोडावा लागला तर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सत्तेवर आहे. या बदलात सैन्याची महत्त्वाची भूमिका मानली गेली. देशात झालेला राजकीय बदल आणि भविष्याबद्दल सैन्यप्रमुख वकार-उज-जमां यांनी एका मुलाखतीत भूमिका मांडली आहे. भारताच्या रणनीतिक हितसंबंधांच्या विरोधात असेल अशाप्रकारचे कुठलेही कृत्य आम्ही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बांगलादेशची जनता आता निष्पक्ष, शांततापूर्ण आणि उत्सवासारखी निवडणूक देशात इच्छिते आणि अंतरिम सरकारचा मुख्य उद्देशदेखील हाच आहे. सैन्य निवडणूक रुपरेषा लागू करण्यात अंतरिम सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जनरल वकार यांनी म्हटले आहे.
शेजारील देशांसोबत चांगले संबंध
भारत एक महत्त्वपूर्ण शेजारी देश आहे. बांगलादेश अनेकार्थाने भारतावर निर्भर आहे. भारतालाही आमच्याकडून सुविधा मिळत आहेत. भारताचे अनेक नागरिक बांगलादेशात औपचारिक आणि अनौपचारिक स्वरुपात काम करत आहेत. तर बांगलादेशचे लोक उपचारासाठी भारतात जाणे पसंत करतात. आमचा देश भारताकडून मोठ्या प्रमाणात सामग्री खरेदी करतो. याचमुळे बांगलादेशची स्थिरता भारताच्याही हिताची आहे. हे देवाणघेवाणीचे नाते आहे. हे नाते निष्पक्षतेवर आधारित असायला हवे. आम्ही समानतेच्या आधारावर चांगले संबंध ठेवणार आहोत. परंतु बांगलादेशच्या जनतेला भारत वरचढ ठरत असल्याचे वाटणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार असल्याचे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे.
हितसंबंधांची काळजी घेऊ
भारताला त्याच्या ईशान्य क्षेत्रात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बांगलादेशचे सहकार्य कायम राहणार आहे. आम्ही आमच्या शेजारील देशाच्या रणनीतिक हितसंबंधांच्या विरोधात कुठलेही पाऊल उचलणार नाही. तसेच आमच्या हिताच्या विरोधात शेजारील देश कुठलेही कृत्य करणार नाही अशी अपेक्षा करू. आम्ही त्यांच्या हितसंबंधांची काळजी घेऊ, मग त्यांनीही आमच्या हितसंबंधांची काळजी घेणे अपेक्षित असल्याचे उद्गार जनरल वकार यांनी काढले आहेत.
म्यानमारचा मुद्दा
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे त्याला लागून असलेल्या सीमेवरील स्थिरता अडचणीत येणार नाही. म्यानमारच्या सीमेतून आमच्या लोकांवर हल्ले केले जाणार नाहीत. तसेच आमच्या देशाला योग्य प्रमाणात पाणी मिळेल. द्विपक्षीय संबंध समान स्तरावर असायला हवेत. आमची सर्वांसोबत मैत्री आणि कुणाबद्दल द्वेष न बाळगण्याची विदेश नीती असल्याचा दावा सैन्यप्रमुखांनी केला.